अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 35 लाख 71 हजार 312 मतदार संख्या असलेली प्रारूप मतदार यादी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली. या मतदार यादीत आपले नाव आहे का? हे मतदारांना तपासता येणार आहे. शिवाय नवीन मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मागील तीन महिन्यांपासून मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. शुक्रवारी (दि. 27) जिल्ह्यात 35 लाख 71 हजार 312 मतदारसंख्या असलेली प्रारूप यादी प्रत्येक प्रांताधिकारी, तहसील कार्यालय तसेच जिल्हाभरातील 3 हजार 731 मतदान केंद्रांवर प्रसिद्ध केली आहे. यादीत नसेल तर नाव समाविष्ट करणे, नाव वा पत्त्यात बदल करणे, नावांची वगळणी आदींबाबत नमुना क्र. 6, 7, 8 व 8 अ भरून देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
1 जानेवारी 2024, 1 एप्रिल 2024, 1 जुलै 2024, 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण करणार्या युवकांनी नमुना 6 अर्ज भरून द्यावा. त्या-त्या अर्हता दिनांकास त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील. सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीचे अवलोकन करून आवश्यक ती सुधारणा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.