पुणे | प्रतिनिधी Pune
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या २३ एप्रिल २०२६ , गुरुवारी मतदान होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, मतदारसंघातील एकूण ४७८ मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री व महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह रिंगणात असलेल्या एकूण २३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या मतदानयंत्रात बंद होणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे लोकप्रिय आमदार अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजीविमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून, या पार्श्वभूमीवर येथे पोटनिवडणूक घेतली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना
उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व मित्रपक्ष एकवटलेले पाहायला मिळाले.
सुनेत्रा पवार यांच्यासमोर करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले, तरी मतदानाचा नेमका टक्का किती राहतो आणि त्यांना किती मताधिक्य मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती मतदारसंघाच्या अंतिम मतदारयादीनुसार एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष, १ लाख ९० हजार ६८४ महिला आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स आणि ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे केंद्रांवर उपलब्ध करून दिली आहेत. याव्यतिरिक्त तांत्रिक बिघाड झाल्यास खबरदारी म्हणून ६० ईव्हीएम व व्हीव्हीपॅट आणि १२० बॅलेट युनिट्स राखीव ठेवण्यात आली आहेत.
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी १६५ वाहनांचा ताफाही तैनात करण्यात आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. दुपारी कडक ऊन आणि त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह येणारा पाऊस यामुळे या निवडणुकीवर पावसाचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे. या वातावरणाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या पोटनिवडणुकीची
मतमोजणी ४ मे रोजी बारामती
एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात पार पडणार आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे. पवार कुटुंबीयांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, बारामतीत
उच्चांकी मतदानाची नोंद होणार का, याचीच आता उत्सुकता आहे.





