Saturday, July 27, 2024
Homeनगरवखार महामंडळाच्या गोडाऊनमधील स्ट्राँगरूमध्ये मतदान यंत्रे सीलबंद; पोलिसांचा बंदोबस्त

वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील स्ट्राँगरूमध्ये मतदान यंत्रे सीलबंद; पोलिसांचा बंदोबस्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 13) पार पडली असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये सीलबंद झाले आहे. ईव्हीएम यंत्रे वाहनातून नगर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविण्यात आले आहेत. ही प्रक्रिया सोमवारी रात्रीपासून मंगळवारी (दि. 14) दुपारपर्यंत अत्यंत सुरक्षितपणे पार पडण्यात आली. स्ट्राँगरूम परिसरात तिहेरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे.

- Advertisement -

दरम्यान मंगळवारी दुपारी स्ट्राँगरूमध्ये सर्व मतदान यंत्रे उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सील करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सोमवारी अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर रात्री ईव्हीएम मशिन त्या त्या विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या होत्या.

त्या ठिकाण ईव्हीएम मशिनची मोजणी करून त्या व्यवस्थित सीलबंद करण्यात आल्या. तेथून त्या ईव्हीएम मशिन नगर एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमधील स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया मंगळवारी दुपारपर्यंत सुरू होती. जिल्हाधिकारी सालीमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर, अधीक्षक ओला, अपर अधीक्षक खैरे यांच्या उपस्थितीत सर्व मशिन दुपारी सीलबंद करून स्ट्राँगरूमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

4 जूनपर्यंत डोळ्यात तेल घालून पहारा
ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघांसाठी स्वतंत्र भव्य स्ट्राँगरूम उभारण्यात आल्या आहेत. या स्ट्राँग रूमच्या संरक्षणासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पुढील 20 दिवस म्हणजेच 4 जूनपर्यंत ही यंत्रणा अशीच कार्यरत राहणार आहे. गोडाऊनच्या भोवती तिहेरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यात सीआरपीएफ प्लाटूनचा पहिला घेरा, त्यानंतर एसआरपीएफ प्लाटूनचा दुसरा घेरा, तर तिसर्‍या फेर्‍यात पोलीस अधिकारी, अंमलदार ठेवण्यात आले आहेत.

टेहाळणीचे मनोरे
एमआयडीसीत वखार महामंडळाच्या गोडाऊनकडे जाणार्‍या रस्त्यावर बॅरेकेटींग करण्यात आले आहे. तसेच गोडाऊनच्या चारही बाजूने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. टेहाळणीचे मनोरे तयार करण्यात आले असून त्यावर पोलीस अंमलदार 24 तास पहारा देत आहेत. गोडाऊन परिसरात प्रवेश बंद करण्यात आला असून रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍या नागरिकांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.

वरिष्ठांकडून दररोज तपासणी
स्ट्राँगरूम भोवती लावण्यात आलेल्या बंदोबस्ताची पाहणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून दररोज केली जाणार आहे. सीसीटीव्ही सुरू आहे का? पोलिसांकडून 24 तास व्यवस्थित पहारा दिला जातो का? याची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांच्या स्ट्राँग रूमला दररोज भेटी असणार असून त्यांच्याकडूनही तपासणी केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या