Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजलोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील ११ मतदारसंघात उद्या मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यातील ११ मतदारसंघात उद्या मतदान

निवडणूक आयोगाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

प्रचार सभांच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोपणाची राळ उडालेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या, सोमवारी राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुलगा,सून, बहीण यांना निवडून आणण्यासाठी बाप, सासरे आणि भाऊ अशी नात्याची कसोटी लागली आहे. या निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ खडसे, डॉ. विजयकुमार गावित, माजी मंत्री के. सी. पाडवी आणि धनंजय मुंडे अशा दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

- Advertisement -

राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदासंघात उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. गेल्या तीन टप्प्यातील निवडणुकीप्रमाणे चौथ्या टप्प्यात सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. मतदारांना उन्हाच्या झळांचा त्रास सुसह्य व्हावा म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे चौथ्या टप्प्यात मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडेल, असा निवडणूक अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरी सहावाजेपर्यंत मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदाराला त्याचा हक्क बजावता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संध्याकाळी उशीरपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा सुरळीतपणे पार पडावा यासाठी पोलीस यंत्रणेने कंबर कसली असून निवडणूक आयोगाची यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.

चौथ्या टप्प्यात एकूण २९८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २ कोटी २८ लाख मतदारहून अधिक मतदार उद्या या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करतील. बीड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४१ उमेदवार रिंगणात असून सर्वात कमी ११ उमेदवार हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहेत.

हायव्होल्टेज लढती

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अहमदनगर, बीड, पुणे, औरंगाबाद, शिरूर, नंदुरबार या लोकसभा मतदारसंघातील लढती हायव्होल्टेज म्हणून ओळखल्या जात आहेत. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके विरुद्ध भाजपचे सुजय विखे पाटील अशी तुल्यबळ लढत होत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली संपूर्ण शक्ती मुलगा सुजयच्या मागे उभी केली आहे. तर यानिमित्ताने नगर जिल्ह्यातील विखे विरोधक एकत्र आले आहेत. बीडमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी आव्हान दिले आहे. येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पुण्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ अशी ‘नेक टू नेक ‘ लढत अपेक्षित आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा ‘ कसबापेठ’ हा बालेकिल्ला सर करून विजयी झालेले धंगेकर पुन्हा जायंट किलर ठरतील किंवा कसे याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होत आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी येथून निसटता विजय मिळवून आश्चर्याचा धक्का दिला. आता ठाकरे गटाने आपला गड शाबूत राखण्यासाठी प्रयत्न चालवले असून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना शिंदे गटाचे संदिपानराव भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचे आव्हान आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील लढाईकडे ‘शिवाजी विरुद्ध संभाजी’ म्हणून पाहिले जाते. अजित पवार गटाचे शिवाजीराव अढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात काट्याची टक्कर आहे. टिव्ही मालिकांमधील संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे डॉ. कोल्हे हे लोकप्रिय ठरले होते. आता हीच लोकप्रियता कायम आहे किंवा कसे याचा फैसला आज शिरूरमधील मतदार करणार आहेत. नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना गावित आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे चिरंजीव ऍड. गोवल पाडवी यांच्यात सामना आहे. सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या डॉ. हिना गावित यांना यावेळी प्रस्थापित म्हणून मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नाराजीवर मात करून डॉ. हिना गावित विजयाची हॅटट्रिक साधतील का, याविषयी उत्सुकता आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट यंदा प्रथमच जळगाव लोकसभेची जागा लढत आहे. येथे ठाकरे गटाचे करण पवार आणि भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत आहे. करण पवार हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात दाखल झाले. त्यांना भाजपचे मावळते खासदार उन्मेष पाटील यांचे पाठबळ आहे. त्यामुळे येथील निवडणूक ही भाजप विरुद्ध भाजप अशी मानली जाते. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात सरळ सामना होत आहे. माजी मंत्री आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेले एकनाथ खडसे यांनी सून रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा चालवली आहे. जालनामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात खरी लढाई आहे. जालनाची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने येथे मेहनत घेतली आहे. मावळमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई आहे. मावळ हा मतदारसंघ निर्मितीपासून शिवसेनेकडे आहे. मात्र,आता शिवसेनेचे दोन गट झाल्याने खरी शिवसेना कोणती याचा कौल मावळचे मतदार आज देतील. तर शिर्डीत उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते अशी तिरंगी लढत आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवार
नंदुरबार : ११,
जळगाव : १४,
रावेर : २४,
जालना:२६,
औरंगाबाद : ३७,
मावळ : ३३,
पुणे : ३५,
शिरूर : ३२,
अहमदनगर : २५,
शिर्डी : २०,
बीड : ४१

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या