Monday, July 27, 2026
Homeक्राईमPathardi : वृद्धेश्वर येथे 5 लाखांचा 20 किलो गांजा जप्त

Pathardi : वृद्धेश्वर येथे 5 लाखांचा 20 किलो गांजा जप्त

एलसीबी व पाथर्डी पोलिसांची संयुक्त कारवाई || एकाला अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यात अमली पदार्थांविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत वृद्धेश्वर येथे छापा टाकून 5 लाख 250 रुपये किमतीचा 20.010 किलो तयार गांजा जप्त केला. याप्रकरणी राम एकनाथ पुरी (वय 55, रा. वृद्धेश्वर, ता. पाथर्डी) याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाथर्डी पोलिसांनी शहरातील हनुमान बाग व चिंचपूर रोड परिसरात गांजा सेवन करणार्‍या तिघांविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने वृद्धेश्वर येथील शेतगट क्रमांक 361 मधील राम पुरी यांच्या घरावर छापा टाकला. पंचांसमक्ष घराची झडती घेतली असता, घरामध्ये एका गोणीत विक्रीसाठी साठवून ठेवलेला 20.010 किलो तयार गांजा आढळून आला. प्रतिकिलो 25 हजार रुपये दराने या गांजाची किंमत 5 लाख 250 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेला गांजा ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू भागवत, बाळासाहेब नागरगोजे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे, सागर ससाणे, अरुण मोरे यांच्यासह पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, सहाय्यक फौजदार नितीन दराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, कविता माने तसेच पोलीस कॉन्स्टेबल अक्षय वडते, दुर्योधन म्हस्के यांनी सहभाग घेतला. दरम्यान, पाथर्डी पोलिसांनी शहरातील हनुमान बाग व चिंचपूर रोड परिसरात गांजा सेवनाविरोधात सलग तीन कारवाया केल्या.

राहुल अंकुश घोरतळे (रा. शेवगाव रोड, पाथर्डी), संदीप शिवाजी लबडे (रा. चिंचपूर रोड, पाथर्डी) आणि राधाकिसन सिताराम लघे (रा. वामनभाऊ नगर, पाथर्डी) या तिघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या ताब्यातील गांजा सेवनासाठी वापरण्यात येणारी चिलीम, माचीस व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून अल्प प्रमाणातील गांजा जागीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ ए. शेख, संजय जाधव, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर ईलग व इतर कर्मचार्‍यांच्या पथकाने केली. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ‘E20 इंधन’ लक्ष्य; आम आदमी पार्टी आक्रमक,...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल...