Saturday, July 27, 2024
Homeनगरवृद्धेश्वर मंदिरातील 4 दानपेट्या चोरट्यांनी पळवल्या

वृद्धेश्वर मंदिरातील 4 दानपेट्या चोरट्यांनी पळवल्या

करंजी |प्रतिनिधी| Karanji

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी (दि.3) मध्यरात्री मंदिराच्या पाठीमागील बाजूने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील चार दान पेट्या पाठीमागील नदीजवळ नेऊन त्याफोडून त्यातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हा संपूर्ण प्रकार दुसर्‍या दिवशी बुधवारी पहाटे मंदिराचे पुजारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात आला. याबाबतची समजलेली माहिती अशी की, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद करून घेतले. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला व मंदिरातील चार दान पेट्या उचलून पाठीमागील बाजूस नेल्या. मात्र मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात ज्या ठिकाणी आदिनाथांचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या ठिकाणची दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता आली नाही. मंदिराच्या पाठीमागे नदीच्या जवळ चार दान पेट्या नेऊन त्या कटरने फोडल्या. त्यातील लाखो रुपयांच्या नोटा चोरट्यांनी लंपास केल्या. मात्र दानपेटीतील चिल्लर मात्र आहे तशीच ठेवण्यात आली. दानपेटीतील भाविक भक्तांनी टाकलेले काही सोनेचांदीच्या वस्तू देखील चोरट्याने लंपास केल्या.

मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची माहिती समजल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू, कौशल्य निरंजन वाघ तसेच श्वानपथक तसेच ठसेतज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पथकातील रक्षा या श्वानाने मंदिरातील पाठीमागील नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यापासून तपासाला सुरुवात केली पुढे वृद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या राम मंदिरापासून पुढे सावरगाव घाट या डांबरी रस्त्यापर्यंत श्वानाने चोरटे गेल्याची दिशा दाखवली. त्यापुढे मात्र चोरटे वाहनाच्या मदतीने फरार झाले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. वृद्धेश्वर येथे दानपेट्या चोरणार्‍यांचा तात्काळ तपास करून त्यांना अटक करावी अशा सूचना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत. वृद्धेश्वर येथे झालेल्या चोरीच्या घटनेचा भाविक भक्तांसह घाटशिरस ग्रामस्थ देवस्थान समिती यांच्याकडून देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच योग्य दिशेने तपास सुरू केला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. यामुळे त्या फुटेजचा आधार घेऊन निश्चितपणे गुन्हेगारांना अटक करू असा विश्वास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या