शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
घराकडे जाणार्या रस्त्यावर लावलेले ट्रॅक्टर व दुचाकी वाहन बाजुला काढून घेण्यास सांगितल्याने पती-पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे घडली. या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या जबाबावरुन शेवगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (दि. 11) रात्री 8 वाजेच्या सुमारास वाघोली येथील जमधडे वस्ती येथील संपत एकनाथ वांढेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर अशोक देवराम कराळे यांनी लावलेले ट्रॅक्टर व दुचाकी वाहन काढून घेण्याचे सांगितल्याने संपत वांढेकर व अशोक कराळे यांच्यात वादावादी झाली.
या वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. अशोक देवराम कराळे, संतोष देवराम कराळे, अजय अशोक कराळे, आकाश अशोक कराळे, अमोल नंदू गाडगे, उषा अशोक कराळे (सर्व रा. वाघोली, ता. शेवगाव) यांनी संपत वांढेकर व त्यांच्या पत्नीला चेन, वायर रोपने जबर मारहाण केली.
आशाबाई वांढेकर यांच्या अंगावर दुचाकी घातल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. या मारहाणीमध्ये संपत वांढेकर व आशाबाई वांढेकर हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.