अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाळकी (ता. अहिल्यानगर) येथील सरकारी दवाखान्यासमोर 22 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास लाकडी दांडके, लोखंडी गजाने केलेल्या जीवघेणा हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत. दीपक बाबासाहेब भालसिंग, त्यांचा मुलगा गौरव व त्याचा मित्र ऋषीकेश सुरेश कासार (सर्व रा. वाळकी) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दीपक भालसिंग यांनी फिर्याद दिली आहे. शुभम उर्फ भोले जनार्धन भालसिंग, ऋतिक काशिनाथ भालसिंग, ओम काशिनाथ भालसिंग आणि मनोज जनार्धन भालसिंग (सर्व रा. झोपडपट्टी, वाळकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी दीपक यांचा मुलगा गौरव आणि त्याचा मित्र ऋषिकेश यांचा काही कारणावरून संशयित आरोपींसोबत वाद झाला. हा वाद मिटविण्यास फिर्यादी स्वतः घटनास्थळी गेले असता, संशयित आरोपींनी अचानक हल्ला केला.
यामध्ये ऋतिक भालसिंग याने गौरवच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केली, तर शुभम भालसिंग याने ऋषिकेशच्या हातावर लोखंडी गजाने प्रहार केला. या सर्वांनी मिळून फिर्यादी, गौरव व ऋषिकेश यांना लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्यांनी व गजाने मारहाण केली. पोलिसांत केस केली तर जिवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.