मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. देशमुख हत्या प्रकरणात मकोका दाखल झाल्यानंतर कराडचा ताबा एसआयटीने (SIT) घेतला होता. त्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर आज ही कोठडी संपल्यावर कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने बुधवार (दि.२२) रोजी खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडची आज बीड न्यायालयात सुनावणी झाली.
कालच (मंगळवारी) वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित २९ नोव्हेंबरचा आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड २९ नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान,वाल्मिक कराडने (Walmik Karad) ३१ डिसेंबरला पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरणागती पत्कारली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या (Police) ताब्यात आहे. वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी मध्यंतरीच्या काळात त्याच्या सुटकेसाठी परळी आणि आष्टी परिसरात निदर्शने केली होती. यापूर्वी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे.
.