अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेंडी-वांबोरी रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत असताना आता या रस्त्यावर केबलसाठी करण्यात येणारी खोदाईही बेकायदाच होती. यामुळे ही खोदाई थांबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.दरम्यान, खोदाई थांबवण्यात आली असली तरी रस्त्याची जबाबदारी असणारे अधिकारी बेकायदेशीरपणे सार्वजनिक रस्त्याचे नुकसान करणार्यांवर कारवाई करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम, त्यावर खर्च करण्यात आलेला निधी याच्या हिशोबाची जुळवाजुळव बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून सुरू करण्यात आली आहे.
ही जुळवाजुळव करून वरिष्ठांचे ‘समाधान’ करणार्या अधिकार्यांच्या भूमिकेविषयी नाराजीची लाट वाढत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे वांबोरी रस्त्याच्या यापूर्वी झालेल्या दुरूस्तीच्या कामात झालेल्या लफड्यांचे डफडे वाजण्याची शक्यता आहे. यामुळे बांधकाम विभागातील अनेक अधिकारी या विषयावर बोलतांना गुळणी धरून आहेत. नगर-मनमाड रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले असल्याने प्रशासनातील अनेक अधिकारी, नेते शेंडी, वांबोरी, डोंगरगण, वांबोरी घाट, वांबोरी रस्त्याचा मनमाड रोडवरील वांबोरी-मुळा डॉम फाट्यापर्यंतच्या पर्यायी रस्त्याचा वापर करत असताना त्यांच्या निदर्शनासही वांबोरी रस्त्याच्या कामात सुरू असणार्या प्रकाराची बाब कशी आली नाही, असा सवाल नागरिक करताना दिसत आहे. दरम्यान, आता बांधकाम विभागाने गेल्या दहा दिवसांपूर्वी झालेली केबलसाठीची खोदाई बेकायदेशीर असल्याचे मान्य केले आहे. यामुळे बांधकाम विभागाचे अधिकारी पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तलावाजवळील मुरूम चोरीला
वांबोरी रस्त्यावर सध्या पिंपळगाव तलावाच्या सांडव्यावर पुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी सांडव्यात असणारा मुरूम मशीनच्या सहाय्याने काढून पुलासाठी भराव टाकण्यात येत आहे. ही बाब ‘सार्वमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित मुरूमाची रॉयल्टी भरून घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठी इतरांकडून मुरूमाची चोरी सुरू असून याबाबत महसूल विभागाला पत्र दिले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे पुलाच्या कामातील गुढ वाढले आहे.
विभागीय आयुक्तांनाही ‘गचके’
सोमवारी नगर जिल्हा दौर्यावर आलेले नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकार्यांनी नगर तालुक्यातील डोंगरगण याठिकाणी भेट दिली. यावेळी पुलाच्या सुरू असणार्या कामाच्या ठिकाणावरून डॉ. गेडाम आणि सालीमठ गेले. पुलाच्या कामाशेजारी सुरू असणार्या भरावासाठी करण्यात आलेल्या बेकायदा मुरूम उत्खननाच्या खड्ड्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. मात्र, याठिकाणाहून प्रवास करताना त्यांना गचके नक्कीच बसले असतील आणि हे गचके ते विसरणार नाहीत, अशी बोलकी प्रतिक्रिया याठिकाणाहून प्रवास करणार्या प्रवाशांनी दिली.