दिल्ली | Delhi
३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेच्या आधी श्रीलंकेच्या शिलेदाराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasranga) कसोटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे
हसरंगा आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ ४ कसोटी सामने खेळू शकला. कसोटीत त्याच्या खात्यात फक्त ४ विकेट्स आल्या. हसरंगाने २०२१ मध्ये श्रीलंकेसाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळून पदार्पण केले. हसरंगाच्या कसोटीतून निवृत्तीने (Wanindu Hasranga Retirement) चाहत्यांना नक्कीच धक्का बसला आहे.
हसरंगाने मंगळवारी श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाची माहिती दिली, जी बोर्डाने स्वीकारली. हसरंगाच्या निर्णयावर श्रीलंकेच्या बोर्डाने सांगितले की, “श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने श्रीलंका क्रिकेटला कळवले आहे की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. आपल्या निर्णयाची माहिती देताना हसरंगाने सांगितले की, या निर्णयामागील कारण मर्यादित षटकांचे क्रिकेट असून त्याला वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये त्याची कारकीर्द घडवायची आहे.”