Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखमुलगी हवी हो!

मुलगी हवी हो!

समाजातील अनेकांना आजही मुलगी नकोशी वाटत असताना देशवंडी सारख्या छोट्या गावातील लोकांना मात्र मुलगी हवीशी वाटत आहे. देशवंडी हे सिन्नर तालुक्यातील एक गाव! देशवंडी ग्रामपंचायतीने मुलगा-मुलगी भेद संपवण्याच्या मार्गावर एक पाऊल टाकले आहे. 2021-22 या वर्षात गावात 13 मुलींचा जन्म झाला. ग्रामपंचायतीने या मुलींच्या जन्माचा आनंद धुमधडाक्यात साजरा केला. मुलींना प्रत्येकी चांदीची दोन कडी भेट दिली गेली. त्यांच्या मातांचा सत्कार केला आणि संपूर्ण गावात पेढे वाटले. मुलगा आणि मुलीमध्ये भेद करु नका अशा आशयाची भाषणे सर्वच करतात. पण तो विचार किती जण अंमलात आणतात? समाजातील बहुसंख्य क्षेत्रांमध्ये मुली दमदार प्रगती करत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारत आहेत. तरीही मुलगी नकोशी का? मुलगाच जन्माला यावा या हव्यासापोटी काही माणसे अमानुष का बनत असावीत? अन्यायाची अधिकाधिक खालची पायरी का गाठत असावीत? चाळीसगावात नुकतीच एक घटना घडली. दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीने पत्नीचा खून केला आणि स्वत:ही आत्महत्या केली. मुलगाच हवा या अट्टाहासामुळे असंख्य विवाहितांवर अन्याय केला जातो. त्यांना मारहाण केली जाते. प्रसंगी चटके दिले जातात. गर्भलिंग निदान चाचणीसाठी बीड जिल्हा राज्यात बदनाम आहे. मुलीचा गर्भ असल्यास अवैधरित्या गर्भपात केल्याच्या घटना अधूनमधून उघडकीस येतच असतात. अशी दुर्दैवी घटना घडली की अवैध गर्भपात, छळ अशाच मुद्यांची चर्चा होते. तथापि मुली नकोशा का होतात या मानसिकतेचा शोध या निमित्ताने घेतला जाईल का? मुलगा हा वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मानसिकता खोलवर रुजली आहे. विवाहप्रसंगी द्यावा लागणारा हुंडा हेही एक कारण आहे. मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. मुलींची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा अनेक कारणांमुळे मुलगीच नको ही भावना वाढीस लागते. या मुद्यांचे निराकरण झाल्याशिवाय मुली हव्याशा वाटतील का? मुलगा आई वडिलांचा आयुष्यभर सांभाळ करेल अशी पालकांची आशा असते. समाजात अशी किती मुले पालकांचा प्रेमाने सांभाळ करतात? मुलांनीच आईवडिलांना रस्त्यावर सोडून दिल्याच्या करुण कहाण्या माध्यमात अधूनमधून प्रसिद्ध होतात. तेव्हा, मुलींविषयीची बुरसटलेली मानसिकता बदलण्याचे अभिनव मार्ग शोधले जातील का? देशवंडी गावाने त्यांच्यापुरता मार्ग शोधला आहे. त्याला लोकांनी दिलेली साथ तितकीच मोलाची आहे. लोकसहभागाशिवाय असे दीर्घकालीन बदल केवळ अशक्य आहेत. त्यादृष्टीने अनेक समाजांच्या संघटना पुढाकार घेऊ लागल्या आहेत. समाजाला रुचतील आणि पचतील असे उपाय योजत आहेत. विवाह साधेपणाने करण्यावर, हुंडा प्रथेवर बंदी घालण्यावर, पोटजातींतर्गत रोटीबेटी व्यवहाराला मान्यता देण्यावर भर देत आहेत. एका मुलीच्या जन्मावर काही पालक संततीनियमन करताना आढळतात. भलेही असे उपाय योजणारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असेल. पण अंधारात मार्ग दिसण्यासाठी प्रकाशाची एक तिरीपही पुरेशी असते. तात्पर्य, समाजाने अशा छोट्याछोट्या उपायांची दखल घ्यायला हवी. बदल करु पाहाणारांना पाठबळ द्यायला हवे. मुलामुलींच्या जन्मदरातील फरकाचे भीषण परिणाम समाज अनुभवत आहे. तसे होणे समाजासाठी हिताचे नाही याची खुुणगाठ यानिमित्ताने बांधायला हवी. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या