Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधयुद्ध ‘तिघांचे’, फायदा चीनचा!

युद्ध ‘तिघांचे’, फायदा चीनचा!

अमेरिका आणि नाटोकडून एकीकडे प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होण्याची भूमिका घेतानाच दुसरीकडे युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा केला जात असल्याने रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस लांबत चालले आहे. या युद्धाने युक्रेनला उद्ध्वस्त केले आहे, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे, युरोपला असुरक्षित बनवले आहे आणि अमेरिकेचा महासत्तेचा दर्जा अस्थिर झाला आहे; पण या सर्वांतून चीनचा मात्र फायदा झाला आहे. रशियाप्रमाणे अमेरिका चीनवर आर्थिक निर्बंध लादू शकत नाही, याची कल्पना असल्याने चीनचे फावते आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध एखादा आठवडाभर चालेल, असे सुरुवातीला वाटत होते; परंतु तीन आठवडे उलटूनही हे युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. यामध्ये चर्चेच्या तीन फेर्‍या झाल्या, पण त्यातून युद्ध थांबण्याच्या दिशेने सकारात्मक तोडगा किंवा वार्ता घडून आलेली नाही. त्यातूनच एकच गोष्ट साधली गेली ती म्हणजे निर्वासितांना आणि युक्रेनमधील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी काहीकाळ युद्धबंदी करण्यात आली आणि या लोकांना सेफ कॉरिडॉर उपलब्ध करून दिला. मात्र त्यानंतर आजही हा युद्धसंघर्ष सुरूच असून दिवसेंदिवस लांबतच चालला आहे. दरम्यानच्या काळात फ्रान्स, इस्राईलने मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यातूनही काही निष्पन्न झाल्याचे दिसले नाही.

युक्रेन उद्ध्वस्त : रशियाकडून सुरू असलेल्या तुफानी बॉम्ब हल्ल्यांनी, क्षेपणास्रांच्या मार्‍याने जवळपास 60 टक्के युक्रेन उद्ध्वस्त झालेला आहे. युक्रेनधील महत्त्वाच्या शहरांची अवस्था भयाण झालेली आहे. किव ही युक्रेनची राजधानी असून यावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे 50 टक्क्यांहून अधिक शहर उद्ध्वस्त झालेले आहे. असे असतानाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाहीयेत. उलट सोशल मीडियातून समोर येणार्‍या त्यांच्या भाषणांमधून ते रशियाला धमकीवजा इशारे देताना दिसताहेत. त्यांनी गनिमी पद्धतीने रशियाचा मुकाबला सुरू ठेवला आहे.

- Advertisement -

युद्ध का लांबले? हे युद्ध लांबण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे नाटो आणि अमेरिकेकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला शस्रपुरवठा. या शस्रास्र पुरवठ्यामुळे युक्रेनला रशियाशी लढण्यासाठी बळ मिळत आहे. अजूनही हा शस्रास्र पुरवठा सुरू आहे. विशेषतः जॅगलीन हे क्षेपणास्र युक्रेनला पुरवण्यात आले आहे. रणगाडे उद्ध्वस्त करणे ही या क्षेपणास्राची खासियत आहे. युक्रेनच्या फौजांकडून होणार्‍या प्रतिकारामुळे रशियाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पुतिन यांच्या सैन्याला हे युद्ध जिंकणे अवघड होऊन बसले आहे. आता ही लढाई पुतिन यांच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे तेही माघार घेण्यास तयार नाहीयेत. अमेरिका आणि नाटोला हे युद्ध निर्णायक पातळीवर घेऊन जायचे असते तर कदाचित त्यांनी मोठी किंवा अधिक संहारक क्षेपणास्रे, अण्वस्रेही युक्रेनला पुरवली असती. परंतु रशियाची फार मोठी हानी होणार नाही, अशा प्रकारची शस्रास्रेच युक्रेनला पुरवली जात आहेत. यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची आहे.

अमेरिकेला काय साधायचे आहे? येत्या काळात हे युद्ध थांबले तरी युक्रेन हा पूर्णपणे बेचिराख झालेला असणार आहे. मग अमेरिकेने काय साधले? तर अमेरिकेचा मुख्य हेतू आहे तो रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा. त्यादृष्टिकोनातून अमेरिका पावले टाकत आहे. हे युद्ध जितके लांबत जाईल तितका रशियावरील आर्थिक ताण वाढत जाणार आहे. हे युद्ध हायब्रीड युद्ध म्हणून ओळखले जात आहे. कारण हे युद्ध केवळ रशिया आणि युक्रेनच्या फौजांमध्ये होत नाहीये. यामध्ये युक्रेनच्या बाजूने नागरिक आणि मर्सेनरीज म्हणजेच परकीय योद्धे लढताहेत. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर हे युद्ध लढले जात आहे. अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी 5000 निर्बंध लावले आहेत. मुख्य म्हणजे रशियाच्या तेलावर, गॅसवर निर्बंध घालण्यात आले असून युरोपियन राष्ट्रांना यामध्ये सहभागी करण्यासाठी अमेरिका त्यांच्यावर दबाव आणत आहे. यातून रशियाला कंगाल करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत.

युरोप असुरक्षित : या युद्धामुळे युरोप असुरक्षित बनणार आहे. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. युक्रेनच्या युद्धानंतर झेलेन्स्कींना हटवण्यात आले तर तो रशियाचा विजय असेल; परंतु तेवढ्यावरच पुतिन थांबणार नाहीयेत. किंबहुना, युक्रेनच्या माध्यमातून रशियाने पोलंड, रुमानिया या देशांना एक संदेश दिला आहे. हे देश पूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग होते; परंतु आज ते नाटोचे सदस्य आहेत. येत्या काळात रशिया आणि नाटोमधील संघर्ष वाढत जाणार आहे. त्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता युरोपमध्ये निर्माण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे रशियाकडून 50 टक्के नॅचरल गॅस आणि क्रूड ऑईलचा पुरवठा युरोपियन देशांना होतो. युरोपमधील उद्योग व्यवसाय, तेथील वीजनिर्मिती यावरच अवलंबून आहे. पण आता त्यामध्ये मोठा व्यत्यय आला आहे. परिणामी करोनामुळे आधीच अडचणीत असलेला युरोप अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. थोडक्यात, ऊर्जेच्या आणि शांततेच्या दृष्टीने असुरक्षित युरोप या युद्धामुळे पुढे येणार आहे.

अमेरिकेचे महासत्ता स्थान : या युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम भलेही अमेरिका करत असला तरी संपूर्ण युद्धकाळात अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेबाबत जगभरातून टीका झाली आहे. किंबहुना, यामुळे अमेरिकेचे महासत्तापद धोक्यात आले आहे. कारण अमेरिका युक्रेनच्या प्रत्यक्ष मदतीला उतरला नाही. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले तेव्हाही अमेरिकेवर जगभरातून टीका झाली होती. आता युक्रेनमुळे अमेरिकेकडून अनेक छोट्या देशांना जी सुरक्षिततेची हमी दिली जायची त्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

चीनचा फायदा : एकंदरीत पाहता, या युद्धाने युक्रेनला उद्ध्वस्त केले, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले, युरोपला असुरक्षित बनवले आणि अमेरिकेचा महासत्तेचा दर्जा अस्थिर झाला; मग प्रश्न असा पडतो तो यातून फायदा कोणाचा झाला? तो म्हणजे चीनचा! चीनने गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेपुढे स्पर्धात्मक आव्हान उभे केले आहे. किंबहुना, अमेरिकेचा खरा शत्रू चीन आहे. कारण अमेरिकेच्या हितसंबंधांना मुख्य धोका चीनचाच आहे. पण या युद्धाच्या माध्यमातून अमेरिकेने रशियावर टाकलेल्या निर्बंधांमुळे रशिया आणि चीन अधिक जवळ आले आहेत. अमेरिकेचे दोन शत्रू एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. ही बाब बायडेन प्रशासनाच्या लक्षात कशी येत नाही? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सध्याच्या या युद्धसंघर्षामुळे चीनच्या मालाला मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यातून चीन एक मोठी आर्थिक सत्ता म्हणून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनला विरोध करण्याची ताकद अमेरिकेमध्येही नाही. रशियाप्रमाणे अमेरिका चीनवर आर्थिक निर्बंध लावू शकत नाही. कारण अमेरिकेच्या मोठ्या गुंतवणुकी चीनमध्ये आहेत. अमेरिकेचा राष्ट्रध्वजही चीनमध्ये तयार होतो. त्यामुळे चीनवर निर्बंध लावल्यास त्यातून अमेरिकाच गोत्यात येऊ शकते. रशिया आणि अमेरिका यांच्यात फक्त 10 टक्के व्यापार आहे; पण चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 700 अब्ज डॉलर्स इतका आहे. त्यामुळेच अमेरिका चीनविरोधात आर्थिक निर्बंधांचे अस्र वापरू शकत नाही. याची पुरेपूर कल्पना चीनला असल्याने चीनचे फावते आहे. सारांश, या युद्धामुळे चीनला सशक्त बनवले आहे आणि युरोप, अमेरिका, रशियाला एका चक्रव्यूहात अडकवून आर्थिक समस्यांमध्ये लोटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या