Monday, May 20, 2024
Homeनगरआग लागली नाही लावली; गोदाम रिकामा न केल्याने जागा मालकाचे कृत्य

आग लागली नाही लावली; गोदाम रिकामा न केल्याने जागा मालकाचे कृत्य

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल विजय नानकर यांचे कोहिनूर बुक स्टॉल नावाचे दुकान आहे. दुकानासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी कहार गल्ली येथे विक्रम मधुकर मेहरे (रा. कोकमठाण ) यांच्या चुलत्याचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेले हे गोदाम रिकामे करून देण्यासाठी मेहरे हे नानकरकडे तगादा लावत होते. परंतु नानकर यांनी गोदाम रिकामा करून देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्याचा राग येऊन विक्रम मेहरे यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गोदामाला चक्क आग लावून दिली. याआगीत शालेय साहित्य वह्या, पुस्तके, छत्र्या, नोटीस बोर्ड व इतर स्टेशनरी जळून खाक झाली होती.

आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या बंबाला दोन तासांचा अवधी लागला होता. घटनेनंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. एक दिवसानंतर नानकर यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन गाठून वरील आशयाची तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित विक्रम मधुकर मेहरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बी.एच. दाते करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या