Monday, July 27, 2026
HomeनगरKopargaon : गोदामात युरियाची साठेबाजी; संस्थेच्या सचिवांसह दोघांवर गंभीर गुन्हा दाखल

Kopargaon : गोदामात युरियाची साठेबाजी; संस्थेच्या सचिवांसह दोघांवर गंभीर गुन्हा दाखल

ई-पॉसवर साठा शून्य दाखवून गोदामात 354 गोण्या युरिया लपवला || शेतकर्‍यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन फसवणुकीचा आरोप

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मे मंजूर प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित येथे रासायनिक युरिया खताची बेकायदेशीर साठेबाजी, ई-पॉस प्रणालीमध्ये खोटी माहिती नोंदवून शासनाची व शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे सचिव आणि परवानाधारक जबाबदार व्यक्ती अशा दोघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कृषी विभागाचे गुण नियंत्रण निरीक्षक गणेश भाऊसाहेब बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. 23 जुलै 2026 रोजी प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने मंजूर येथील संस्थेवर अचानक छापा टाकला. तपासणीवेळी संस्थेचे सचिव किशोर चंद्रकांत टिळेकर उपस्थित होते. तपासणी दरम्यान खत साठा, विक्री नोंदी आणि ई-पॉस प्रणालीची पडताळणी करण्यात आली असता अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या. युरिया खताचे स्टॉक रजिस्टर उपलब्ध नव्हते. खरेदीची बिले मागितल्यानंतर केवळ चलने दाखवून अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शासकीय नोंदीनुसार गोदामात 389 गोण्या युरिया असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष तपासणीत केवळ 353 गोण्या आढळल्या. म्हणजेच कोणतीही वैध नोंद अथवा परवानगी नसताना 36 गोण्या युरियाची विक्री करण्यात आल्याचे उघड झाले. तपासादरम्यान परवान्यात नोंद नसलेल्या दुसर्‍या गोदामाची पाहणी करण्यात आली. तेथे इफको कंपनीच्या युरियाच्या तब्बल 354 गोण्या साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. विशेष म्हणजे हा संपूर्ण साठा ई-पॉस प्रणालीवर शून्य दर्शविण्यात आला होता. अधिकार्‍यांनी याबाबत विचारणा केली असता, शेतकर्‍यांच्या मदतीने ई-पॉसवरील साठा कमी केला, अशी कबुली सचिवांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सुरुवातीला खरेदीची बिले फाटल्याचे सांगून अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला. ई-पॉस प्रणालीमध्ये चुकीच्या नोंदी करून शासनाची आर्थिक फसवणूक करणे, युरिया खताचा अनधिकृत साठा करणे, शेतकर्‍यांना खत न देता त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन नोंदी पूर्ण करणे आणि खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणे, या आरोपांवरून किशोर चंद्रकांत टिळेकर (सचिव) आणि दादासाहेब विठ्ठल मोरे (परवान्यातील जबाबदार व्यक्ती) यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश, 1985 तसेच भारतीय न्याय संहिता मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत. या कारवाईनंतर कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, खतांची साठेबाजी, ई-पॉस प्रणालीतील गैरव्यवहार किंवा शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक सहन केली जाणार नाही. सर्व खत विक्रेत्यांनी प्रत्यक्ष साठा आणि ई-पॉसवरील नोंदी तंतोतंत जुळतील याची काळजी घ्यावी. अन्यथा दोषींवर अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या

Karjat : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

0
कर्जत |प्रतिनिधी| Karjat तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे (वय 19) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने मानसिक तणावातून 25 जुलै रोजी सायंकाळी...