Friday, May 31, 2024
Homeब्लॉगतापमानवाढीचा सफरचंदानाही फटका

तापमानवाढीचा सफरचंदानाही फटका

जागतिक तापमानवाढीचा फटका जगातील बहुतांश पिकांना बसत आहे. अलीकडे थंड प्रदेशातही तापमानवाढ होत आहे. वाढते तापमान तेथील वैशिष्ट्यपूर्ण पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. सफरचंद हे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील पीक! आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या पिकाचे आरोग्यच आता चिंताजनक झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून तापमानवाढीची चर्चा सातत्याने सुरू आहे. तापमानवाढ आणि पावसामुळे हिमालयात किती बदल होत आहेत, हेही आपल्याला दिसले आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदांच्या बागांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो, हे जगजाहीर आहे. या दोन प्रदेशात सफरचंदाने कोट्यधीश केलेली अनेक कुटुंबे आहेत. तिथून देशभर सफरचंदांची पाठवणी होते. काही सफरचंद निर्यात होतात. सफरचंद हे देशभर लोकप्रिय असलेले फळ आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या खेड्यांपर्यंत ते पोहोचले आहे. तोडणी, प्रतवारी, वाहतूक आदी क्षेत्रात त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाले आहेत; परंतु आता उच्च तापमान आणि वाढत्या आर्द्रतेचा फटका सफरचंदाला बसत आहे.

तापमानातल्या चढ-उतारांमुळे काश्मीरमध्ये अवकाळी बर्फवृष्टी आणि अकाली उष्माघात होत आहे. त्यामुळे सफरचंदाच्या बागांना मोठा फटका बसला आहे. सफरचंद उत्पादनात 30 टक्के घट झाल्याने या प्रदेशातल्या सर्वात मोठ्या उद्योगाला मोठा फटका बसला असून अनेक शेतकरी कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. काश्मीरमधली सुमारे दहा लाख कुटुंबे सफरचंद शेती आणि संबंधित व्यवसायात गुंतली आहेत.

- Advertisement -

काश्मीरमधल्या सफरचंद उद्योगाची उलाढाल सुमारे 12.5 दशलक्ष डॉलर आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी काश्मीरमध्ये 18 लाख टन सफरचंदांचे उत्पादन झाले होते. त्याअगोदरच्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे उत्पादन सुमारे एक लाख टन कमी होते. मागे तापमानात अचानक घट झाल्याने कळ्या गळून पडल्या. त्यामुळे मधमाशा परागीकरणासाठी आल्या नाहीत, असे सफरचंद उत्पादकांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, तापमानात अचानक वाढ झाल्यास झाडांना संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट होते. या भागात मार्चमध्ये दिवसाचे सरासरी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास असते; परंतु यावर्षी मार्चमध्ये तापमान खूपच जास्त होते. परिणामी, काश्मीरमध्ये सफरचंदाची तोडणी लवकर करावी लागली.

सततचा उष्ण वारा आणि ओलावा यामुळे सफरचंदांवर काळे डाग दिसू लागले असून पिकाचा दर्जा घसरल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहे. तज्ज्ञांनी या आजाराला काजळी आणि ‘फ्लायस्पेक’ असे नाव दिले आहे. सफरचंद लागवडीतल्या मोठ्या नुकसानीमुळे हजारो लोकांना या व्यवसायातून बाहेर पडावे लागले आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या एका प्रसिद्ध सफरचंद उत्पादकाच्या पत्नी शमीमा हसन म्हणतात, बदलत्या हवामानामुळे सफरचंद पिकाला रोगांचा तडाखा बसला आहे.

त्यावर रोगांचा परिणाम होणार आहे. सततच्या नुकसानीमुळे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे मुलीला खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत दाखल करावे लागले. तिथे शिक्षण मोफत आहे, पण शिक्षणाचा दर्जा चांगला नाही.

काश्मीरचा उत्तर भाग ‘अ‍ॅपल बाऊल’ म्हणून ओळखला जातो. तिथे उत्तम दर्जाची सफरचंदे पिकतात. अनेक दशकांपासून सफरचंदाच्या बागा उंच जमिनीच्या स्वरुपात विकसित केल्या जात आहेत आणि भात शेतीऐवजी अधिक नफा मिळवण्यासाठी शेतांचे रूपांतर सफरचंद बागांमध्ये केले गेले आहे. 2018 पर्यंत हसन यांच्या कुटुंबाने दर वर्षी सफरचंदाच्या सुमारे तीन हजार बॉक्सचे उत्पादन केले; परंतु आता हे उत्पादन सातशे बॉक्सवर आले आहे.

शमीमा म्हणतात, यावर्षी साधारणपणे सफरचंदाच्या साडेचार खोक्यांचे उत्पादन व्हायला हवे होते; परंतु त्यापेक्षाही कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. कारण सफरचंदाच्या अनेक नवीन झाडांना फळे आली असली तरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. भारतातली 80 टक्के सफरचंद काश्मीरमध्ये तयार होतात.

2016 मध्ये हसन यांच्या कुटुंबाची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपये होती, पण आता ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. हसन सांगतात, आमच्याकडे बँका आणि सफरचंद व्यापार्‍यांचे सुमारे एक कोटी रुपये थकित आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही तांब्याच्या वस्तूंचे दुकान उघडले आहे. आता आम्हाला सफरचंदाच्या बागेत जाण्याचाही तिरस्कार वाटू लागला आहे.

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, काश्मीरमध्ये यावर्षी सरासरीच्या 70-80 टक्के कमी पाऊस झाला आहे. काश्मीरमधल्या विज्ञान शिक्षक शबिना मलिक सांगतात की, तापमान वाढल्यामुळे झाडांवर कीटक येतात आणि त्यांचे खूप नुकसान होते. मलिक यांच्या कुटुंबाकडे सुमारे चाळीस एकर सफरचंदाच्या बागा आहेत. विविध कीटकनाशकांचा वापर करूनही या कीटकांवर नियंत्रण ठेवता येत नाही.

कीटकनाशकांच्या वापरामुळे सफरचंद पिकाचेही नुकसान होत आहे. पीकविमा मिळत नसल्यामुळे सफरचंद उत्पादक कर्जबाजारी होत आहेत. त्यांना दुहेरी फटका बसत आहे. श्रीनगर इथल्या ‘शेर-ए-काश्मीर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठा’चे फळ शास्त्रज्ञ आशिक हुसेन म्हणतात, वसंत ऋतूमध्ये कीटक आणि रोगजनकांच्या संख्येत सामान्य तापमानापेक्षा जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. सफरचंदाच्या बागा नष्ट झाल्या. कारण या तापमानात बिया अंकुरू शकत नाहीत.

साधारणपणे जून महिन्यात काश्मीरमध्ये गारपीट होत नाही, पण आता गारपिटीची तीव्रता वाढत असून सफरचंदाचे पीक खराब होत आहे. खराब कीटकनाशकांमुळे सफरचंदाची झाडे खराब होतात. कर्जबाजारी शेतकरी आता इतर पिकांकडे वळू लागले आहेत.

काश्मीरमधल्या सफरचंदांच्या शेकडो बागांमध्ये शेतकरी आता गहू, मोहरी, मका आणि कडधान्यांची पेरणी करत आहेत. शेतकर्यांनी झाडे तोडण्याऐवजी त्याच बागांमध्ये गव्हाची पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे तिथे उंदीर येऊन सफरचंदाच्या झाडांची मुळे तोडतात आणि हळूहळू ही झाडे नष्ट होतात. बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी असलेले 57 वर्षीय गुलाम हसन बट हे स्वत:च्या सफरचंदाच्या बागा असलेल्या शेतकर्‍यांपैकी एक आहेत. गेल्या अनेक दशकांपासून या बागा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहेत.

बट हे सफरचंदाचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करायचे, मात्र गेल्या चार वर्षांपासून सतत तोट्यात राहिल्याने तेही कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे आता त्यांना सफरचंदाचा व्यवसाय बंद करून गहू पिकवण्यास भाग पडले आहे. ते म्हणतात, उंदीर हळूहळू सफरचंदाची झाडे मारतील. मी गव्हाची लागवड सुरू केली आहे. सफरचंदाचा व्यवसाय आता फारसा फायद्याचा नाही. बँका आणि व्यापार्‍यांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे ही आमच्यावरील आताची सर्वात मोठी जबाबदारी आहे. सफरचंद उद्योगातल्या तोट्यामुळे व्यापार्‍यांनी आपला व्यवसाय बंद केल्याने हजारो लोक या भागातून दूर गेले आहेत.

बारामुल्ला जिल्ह्यातील शेखपुरा गावात राहणारे मुहम्मद शफी वार सांगतात की, आपल्या सफरचंदाच्या बागेतून ते दरवर्षी सुमारे पाच लाख रुपये कमावत होते, पण आता त्यांना पहलगाममधल्या एका हॉटेलमध्ये काम करावे लागत आहे, जिथे त्यांचे दरमहा उत्पन्न फक्त सात-आठ हजार रुपये आहे. 2018 मध्ये त्यांच्या फळबागांमध्ये सफरचंदांच्या एक हजार बॉक्सचे उत्पादन झाले होते, मात्र आता हे उत्पादन दोनशे बॉक्सवर आले आहे.

ते म्हणतात, सफरचंद बागांना सिंचनाची पुरेशी सोय झाली तर ते झाडे तोडून त्याचे शेतात रूपांतर करतील आणि तिथे गहू आणि भात पिकवतील. ते म्हणतात, किमान मी माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अन्नधान्य निर्माण करू शकेन. सफरचंदाची शेती आतबट्ट्याची झाली आहे. ती सोडून शेतकरी आता हॉटेलमध्ये काम करण्याची नामुष्की आली आहे.

कमी पगारात नोकरी करावी लागत असल्याने एकेकाळची गर्भश्रीमंत कुटुंबे दारिद्य्राच्या खाईत ढकलली जात आहेत. त्यांच्यापुढे जगण्याचे आव्हान आहे. ही परिस्थिती केवळ हवामान बदलामुळे झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या