मुंबई | Mumbai
वेस्ट इंडिजचा माजी स्टार ऑलराउंडर कायरन पोलार्ड हा त्याच्या ताकदीसाठी ओळखला जातो. पोलार्डने आपल्या धमाकेदार बॅटिंग कौशल्याच्या जोरावर आतापर्यंत अनेकदा विंडिजला अशक्य सामन्यात विजय मिळवून दिला आहे. पोलार्डने हाच झंझावात कॅरेबियन प्रीमिअर लीग 2023 मध्येही कायम ठेवलाय. पोलार्डने 27 ऑगस्टला झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
या सामन्यात पोलार्डने एका षटकात 4 षटकार मारले, ज्यामध्ये तीन षटकार 100 मीटरपेक्षा लांब अंतरावर पडले. त्याच्या या पराक्रमाचा व्हिडिओ कॅरेबियन प्रीमियर लीगच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना पोलार्डने अफगाणचा फिरकी गोलंदाज इझारुलहक नावेदच्या षटकात हा पराक्रम केला.
नावेद सामन्यातील 15 वे षटक टाकण्यासाठी चेंडू घेवून आला असता त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि किरॉन पोलार्ड स्ट्राइकवर आला. पोलार्डने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने 101 मीटर लांब षटकार ठोकला. यानंतर नावेदने पुढचा चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर पुढच्या फ्री हिट चेंडूवर पोलार्डने दोन धावा घेतल्या आणि चौथ्या चेंडूवर तो पुन्हा नावेदसमोर आला. यावेळी पोलार्डने 107 मीटर लांब षटकार ठोकला. यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर पोलार्डने 102 मीटर लांब षटकार तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 95 मीटर लांब षटकार मारला. नावेदने या षटकात एकूण 28 धावा दिल्या.