Tuesday, July 2, 2024
Homeनाशिकनाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

7 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास घेणार निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

यंदा मराठवाड्याला पाणी देण्यात आल्याने मनपाने शहरासाठी केलेल्या मागणीपेक्षा कमी पाणीसाठा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी गंगापूर धरणातील सुमारे 600 दलघफू मृत पाणीसाठा उचलण्याची परवानगी दिली आहे. त्याच्या सर्व्हेसाठी मनपाला निविदा काढायची असून लोकसभा व नंतर शिक्षक निवडणूक आचारसंहितेमुळे ती सध्या रखडली आहे. म्हणून मनपाने शासनाकडे विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र शासनाकडून त्याचे उत्तर न मिळाल्याने आता 7 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्यास शहरात पाणी कपात अटळ आहे.

यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मनपा प्रशासनाने चर खोदणे सर्वेक्षणासाठी पाठवलेला प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचा दावा शासनाच्या नगरविकास विभागाने केला होता. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गंगापूर व दारणा समूहातून तीन टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले. परिणामी मनपाने मागणी केलेल्या पाणी आरक्षणात मोठी कपात करण्यात आली. 5300 दलघफू पाणी मंजूर करण्यात आले.

31 जुलै 2024 पर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी जलसंपदाने गंगापूर धरणातील 600 दलघफू मृतजलसाठा उचलण्यास मंजुरी दिली आहे. मात्र धरणाची पातळी 598 मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागणार आहे. आचारसंहिता असल्याने महापालिका प्रशासनाने चर खोदणे सर्वेक्षण परवानगीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र पाठवले. मात्र त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आता सर्व भीस्त पावसावर येऊन ठेपली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या