Tuesday, April 15, 2025
Homeनगरजल व्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रम दिशादर्शक ठरेल- ना. विखे

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा उपक्रम दिशादर्शक ठरेल- ना. विखे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरेल. असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल 2025 कालावधीत मजल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ राज्यातील सर्व जिल्हयामध्ये एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच तालुका स्तरावर सर्व आमदारांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पंधरवड्याच्या आयोजना बाबत मंत्री विखे पाटील म्हणाले की, या पंधरवड्याच्या माध्यमातून जल साक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जाणार आहे. लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी कालवे प्रवाही राहणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कालवे दुरुस्ती, कालव्यातून होणारी गळती रोखण्यासाठी जल व्यवस्थापन तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कालव्यांची स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल हाच या पंधरवड्याच्या उपक्रमाचा उद्देश आहे.

स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जल व्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देतानाच, कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यासही प्राधान्य देण्यात असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणार्‍या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर यापुढे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे विभागांच्या जागांची 7/12 वर नोंदणी करून घेता येईल .विभागाच्या जागा अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम या पंधरा दिवसात राबविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घेण्याच्या सूचना संबधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि क्षेत्रीय स्तरावर उपाय योजनांसाठी आग्रह केला जाणार आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण, शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकीत पाणीपट्टी वसुली, जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांनाही प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट करून सर्व उपक्रमात नागरीकांनी सहभाग देण्याचे आवाहन केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अहिल्यानगरात डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभागही लक्षणीय होता. शहरातील मिरवणुकीत यंदा 7...