डॉ. उदय निरगुडकर
आज पाणी हाच राज्या-राज्यांमधला संघर्षाचा मुद्दा आहे. काही वर्षांपूर्वी कावेरी नदीच्या प्रश्नावरून कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अक्षरशः युद्ध झाले होते. कळीचा मुद्दा होता कावेरीचे पाणी कोणी किती घ्यायचे हा. ज्या बंगळुरू शहराला कावेरी पाणीपुरवठा करते तिथे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य. पण हे चित्र पालटणारा एक संशोधन अहवाल समोर आहे, त्याची नोंद आवर्जून घ्यायला हवी.
पाणी हे जीवन आहे. जीवनाची शाश्वती प्राणवायू, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीवर अवलंबून आहे आणि सध्या पाणी हाच मोठा संघर्षबिंदू झाला आहे. काही वर्षांपूर्वी कावेरी नदीच्या प्रश्नावरून कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अक्षरशः युद्ध झाले होते. हजारो वाहने जाळण्यात आली होती. दोन्ही बाजूकडून शहरे-जिल्हे ठप्प होते. ज्या बंगळुरू शहराला कावेरी पाणीपुरवठा करते तिथे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य. पण हे चित्र पालटणारा एक संशोधन अहवाल समोर आहे, त्याची नोंद आवर्जून घ्यायला हवी.
बंगळुरूची लोकसंख्या 1 कोटी 35 लाख आणि पाण्याची वार्षिक मागणी 18-19 टीएमसीची. कावेरीतून मिळते जेमतेम 11-12 टीएमसी पाणी. म्हणून सतत पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यायची वेळ या शहरावर येते. यावर उपाय शोधून अंमलबजावणीचा आराखडा देणारा एक संशोधन अहवाल सध्या खूप गाजतोय. कारण त्याची अंमलबजावणी लोकांनीच सुरू केलीय. गेल्या काही दिवसांत बंगळुरूमधून वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर जलसंवर्धनाचे अफलातून प्रयोग सातत्याने समोर येत आहेत. तलावांच्या पुनरुज्जीवनाच्या कहाण्या समोर येत आहेत आणि हेच या समस्येचे उत्तर आहे.
हा अहवाल सांगतो, जल साठवणुकीचे, संवर्धनाचे काम पुढच्या दोन वर्षांत चोख झाले तर त्यातून 15 टीएमसी पाणी मिळेल. बंगळुरूमधून बाहेर पडणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून 16 टीएमसी पाणी मिळेल. म्हणजेच बंगळुरूची गरज 18 टीएमसी असताना त्यांच्याकडे पुढच्या काही वर्षांमध्ये 31 टीएमसी पाणी असेल अशी दमदार पावले आता पडत आहेत. बंगळुरूमध्ये दरवर्षी साडेसातशे ते साडेआठशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो. म्हणजेच साधारणतः 15 टीएमसी पाणी. म्हणजे एकूण पाण्याच्या गरजेपैकी 75 टक्के गरज पावसाच्या पाण्यावरच भागवता येणार आहे. पण तसे होत नाही. याचे कारण रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नव्हते. म्हणूनच आता लोकांनी पुढाकार घेऊन वैयक्तिक पातळीवर शेकडे प्रयोग यशस्वी केले.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे तुमच्या घराच्या परिसरात, छपरावर पडणारे पावसाचे पाणी साठवणे आणि जमिनीत मुरवणे. हेच पाणी तुमची चार ते पाच महिन्यांची तहान भागवते. दुसरा मार्ग म्हणजे तलावांचे पुनरुज्जीवन. बंगळुरूच्या भूगोलाचा आणि पाणी साठवणार्या जलाशयांचा अभ्यास केला तर असे दिसते की, बंगळुरूमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जलाशय होते आणि ते सर्व एकमेकांशी जमिनीखालून संलग्न होते. आज तिथे अशा जलाशयातून गाळ काढण्याचे काम जोरात सुरू आहे. यामुळे के. सी. व्हॅली जलाशयातून पुढच्या दोन वर्षांत साडेपाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आय.टी. इंडस्ट्री फोफावल्याने एकेकाळी वृक्षराजीने बहरलेले बंगळुरू आता काँक्रिटचे जंगल बनले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. ते वाहून जाते. प्रदूषित करणारे अनेक कारखाने जवळपास अनिर्बंधरीत्या उभे राहिल्याने जमिनीतून उपसलेले पाणी केवळ अशुद्ध नव्हे तर प्रदूषित असते. त्यात शरीराला घातक असे हेवी मेटल मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
1800 मध्ये एकट्या बंगळुरूमध्ये हजारहून अधिक तलाव होते. त्यांची साठवण क्षमता 35 टीएमसी एवढी आहे. आज दरवर्षी थोडा पाऊस जास्त झाला की बंगळुरू शहरात पूरपरिस्थिती उद्भवते. याचे कारण जलाशयांची संख्या एक हजाराहून दोनशेच्या खाली घसरली. आता पाणी वाहून जाते अन् शहर तहानलेले राहते. कावेरीचे पाणी या शहरासाठी पुरेसे नाही, हे या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढे कावेरीतलेच पाणी कमी झाल्याचे संशोधन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी समोर आणले. बारमाही वाहणारी कावेरी आता कशी आठ महिन्यांतच कोरडी पडते याचे विदारक चित्र त्यांनी भारतभर फिरून जनजागृती करून दाखवून दिले. काही ठिकाणी तर पात्र इतके आटले आहे की तिथे चार महिने जमिनीवरून सर्रास वाहतूकही होते. नदीच्या किनारी असणार्या वृक्षराजीत कमालीची घट झाल्यामुळे हे घडले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्या भागात कूपनलिकांना पाणी लागत नाही, मग शहरांना पुरवण्याची गोष्टच दूर. हे सर्व त्यावेळी नवीन होते. या प्रकरणाचा अभ्यास केल्यास ताजा संशोधन अहवाल समोर येतो. कर्नाटकाच्या समृद्धीसाठी नद्यांची जोडणी करण्याची खर्चीक योजना राबवू नये, असे हा अहवाल सांगतो. त्याऐवजी चांगल्या वैयक्तिक जलसिंचन अभियानाची गरज अधोरेखित केली जाते.
आजही बंगळुरू शहरातल्या तलावांजवळ अगदी उन्हाळ्यातही शहरातल्या इतर भागांपेक्षा सुमारे दोन डिग्री तापमान कमी असते. हे तलाव बुजवल्यामुळे तापमानात तर वाढ झालीच; परंतु दारिद्य्ररेषेच्या आसपास असणारा एक मोठा वर्ग रोजगारापासून वंचित झाला. तलाव प्रदूषित झाल्यामुळे तिथली मासेमारी, त्याच्या काठावर उगवणारे गवत आणि इतर धंदे बंद झाले आणि हे सर्व भूमिपुत्र (तलावपुत्र) उघड्यावर आले. आज त्यांच्याच जनजागृतीचे मोठे अभियान यशस्वी होताना दिसतेय. एकूणच पर्यावरण साक्षरतेची गरज त्यातून समोर येतेय. धोरणकर्त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा अहवाल आज दीपस्तंभासारखा उपयोगी बनतोय. आता तिथे तलावाची डंपिंग ग्राऊंडस् बनत नाहीयेत तर जनसहभागातून त्याच्या संवर्धनाची योजना यशस्वी होताना दिसतेय. पूर्वी सातत्याने दिसणारी पूरपरिस्थिती यामुळे पुढील दोन-चार वर्षांत आटोक्यात यावी ही अपेक्षा. त्यासाठी कोणत्याही मोठ्या महागड्या परदेशी सल्लागार मंडळाची गरज नाही, तर इथल्या मातीतल्या भूगर्भ आणि जलतज्ज्ञांनी प्रकाशित केलेला संशोधन अहवाल तपासून पाहायला हवा. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज त्या शहरातून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अचंबित आणि प्रेरित करणार्या कहाण्या समोर येत आहेत, जाणीवपूर्वक वृक्षलागवड होतेय. तलावाच्या काठी आणि इतरत्र वृक्षारोपण करताना तिथल्या वातावरणाशी, मातीशी सुसंगती राखत देशी झाडांचीच लागवड केली जातेय.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडतेय ती सांडपाण्याच्या प्रक्रियेची. फरक दृष्टिकोनातला आहे. धोरणकर्ते सांडपाण्याकडे एक समस्या म्हणून नव्हे तर एक उपलब्धी म्हणून पाहायला लागले आणि चित्र पालटायला सुरुवात झाली. हा प्रकल्प पूर्णपणे यशस्वी होईल तेव्हा त्यातून तब्बल 16 टीएमसी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. सांडपाण्याची प्रक्रिया तीन स्तरावर केली जाते. पहिल्या प्रकारात सांडपाण्यातले मोठे पार्टिकल्स काढून टाकले जातात तर दुसर्या स्तरावर त्यातली घातक रसायने दूर केली जातात आणि तिसर्या प्रकारात कॅन्सर आणि किडनीच्या विकारांना आमंत्रण देणारे अतिघातक नायट्रेट काढून टाकले जाते. आज महाराष्ट्रातल्या अनेक नगरपरिषदांमध्ये अशा तीन स्तरांवर प्रक्रिया होताना दिसत नाही. याचे कारण हे काम खर्चीक आहे आणि त्यासाठी धोरणात प्राथमिकता असायला हवी. ती नसल्यामुळे शेतीला उपलब्ध करून दिले जाणारे पाणीही बर्याच ठिकाणी प्रदूषित असते. त्यातच मासेमारी आणि गवत अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. या सगळ्यामुळे आपल्या शरीरात नकळतपणे घातक रसायन विष पसरवते. म्हणूनच हा प्रयोग आणि संशोधन अहवाल आणि त्याची नोंद महत्त्वाची आहे.
आता कावेरीच्या किनार्यावर लावली जाणारी झाडे जाणीवपूर्वक देशी आहेत. या सगळ्यामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी आता जमिनीत मुरेल. भूजलगर्भाची पातळी निश्चितच सुधारेल. शहराला एक उत्तम ग्रीन कव्हर मिळेल आणि हे सर्व आपल्या डोळ्यासमोर घडतेय. अशा प्रकारे नैसर्गिक देशी वनराई वाढते तिथे पाण्याच्या मुबलकतेमुळे शेतकरी वर्षाला तीन-तीन पिके घेतात आणि हे नसते तिथे एक पीक घ्यायची मारामार होते. पण हे बदलणारे चित्र खूपच आश्वासक आहे. उद्या बंगळुरू कदाचित जवळपासच्या तहानलेल्या प्रदेशाला पाणी देऊ शकेल. पाण्यावरून रक्ताचे पाट वाहिले तिथे समृद्धीची पहाट येईल. काल चेन्नई तहानलेले होते. आज बंगळुरू तहानलेले आहे. उद्या हीच वेळ मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवर येणार. त्यासाठी एक उत्तम मॉडेल आपल्यासमोर येतेय. त्याचे नुसते स्वागत नव्हे तर स्वीकार आणि अंमलबजावणी करायला हवी. तरच पाणी हे जीवन आहे या म्हणण्याला अर्थ उरेल.