Friday, June 21, 2024
Homeनगरवीजपंप चोरताना दोघांना पकडले; गुन्हा दाखल

वीजपंप चोरताना दोघांना पकडले; गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

पाण्यातील मोटार व पाईप चोरून नेत असताना दोघा भामट्यांना सुधाकर घोरपडे यांनी रंगेहाथ पकडले. दोन्ही भामटे 2 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान सडे शिवारातील देवनदी येथे चोरी करताना आढळून आले.

सुधाकर चापाजी घोरपडे (वय 69) रा. सडे, ता. राहुरी. यांची सडे शिवारात शेत जमीन आहे. शेत जमीनीस पाणी देण्यासाठी त्यांनी देव नदी वरील बंधार्‍यावरुन पाईप लाईन आणलेली असुन बंधार्‍यावर ईलेक्ट्रीक मोटरी बसविलेल्या आहेत. 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सुधाकर घोरपडे हे देव नदी वरील बंधार्‍यावर असलेल्या मोटरी पाहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना काही अंतरावर असलेल्या बाबासाहेब बाबुराव धोंडे यांची देव नदी वरील बंधार्‍यात असलेली पाणबुडी मोटर व मोटरीचा पाईप दोन अनोळखी इसम चोरत असताना दिसून आले.

त्यांनी ताबडतोब बासाहेब धोंडे यांना फोनद्वारे सदरचा प्रकार सांगीताला. त्यानंतर काही वेळातच बाबासाहेब धोंडे, जयराम बाबुराव धोंडे, शांताराम घोरपडे व इतर लोक त्या ठिकाणी आले व सदर दोन अनोळखी इसमांना जागीच पकडले.

त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क केला असता काही वेळातच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस त्या ठिकाणी गेले व त्यांनी दोन अनोळखी इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव हरिभाऊ गोरख माळी (वय 36) रा. शिंगवेतुकाई, ता. नेवासा. तसेच रावसाहेब नामदेव पिंपळे (वय 45) रा. टाकळीकाझी ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.

सुधाकर चापाजी घोरपडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन दोघांवर गुन्हा रजि. नं. 349/2023 भादंवि कलम 379, 511 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या