भंडारदरा । वार्ताहर
नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर तसेच नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भंडारदरा-निळवंडे समुहातून प्रातिनिधीक स्वरूपात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. बंधाऱ्यातील फळ्या काढल्यानंतर या धरणांमधून विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, मुळा धरणातून २६ नोव्हेंबर रोजी जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
मुळा आणि प्रवरा नदीवरील बंधाऱ्यांमधील फळ्या काढण्याच्या कामासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात काल प्रशासनाची बैठक झाली असून याबाबतचे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रात्री उशीरापर्यंत प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची पाणी सोडण्याच्या कार्यवाही बाबत बैठक सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर कोल्हापूर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर या कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी बंधाऱ्यातील फळ्या काढण्यात येण्याची शक्यता आहे.
राहाता (तालुका प्रतिनिधी)
नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने तयारी केली आहे. काल शुक्रवारी रात्री ११ वाजता दारणा धरणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरण समुहातून अर्धा टीएमसी, दारणा समुहातून २.६५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. काल शुक्रवारी रात्री ११ वाजता दारणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, धरण परिसरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कलम १४४ प्रशासनाने लागू केला आहे. गोदावरी नदीतील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यामध्ये काहीअंशी पाणी आहे. त्या बंधाऱ्याच्या फळ्या काढण्याचे काम आज शनिवारी दिवसभर सुरू राहणार आहे. याशिवाय पोलीस बंदोबस्त, तसेच वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने प्राप्त केले आहेत. त्यामुळे जायकवाडीला पाणी जाणार आहे. काल रात्री उशीरा पाणी सोडण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे अधिकारी नाशिकला दाखल झाले. मोठ्या बंदोबस्तात पाणी जायकवाडीला जाणार आहे.
दरम्यान जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे नगर तसेच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी सोडण्याचा निर्णय यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील उभ्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. जायकवाडीतील मृतसाठा यावर्षी वापरण्यात यावा, असा मतप्रवाह होता. परंतु विखे पाटील कारखाना व संजीवनी कारखान्याच्या याचिका पाणी न सोडण्याबाबत होत्या. त्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. कोळपेवाडी कारखान्याच्या याचिकेवर ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर विखे पाटील कारखान्याच्या याचिकेवर १२ डिसेंबर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत अपेक्षीत पाणी सोडले जाऊ शकते. मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, विविध संघटना पाणी सोडण्याबाबत आग्रही आहेत. प्रसंगी आंदोलन करून त्यांनी पाणी सोडण्याचा आग्रह आंदोलनाच्या माध्यमातून गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाकडे धरला होता. या महामंडळाने पाणी सोडण्यात येत असल्याबाबतचे पत्र काल मराठवाड्यातील आंदोलकांना दिले. त्यामुळे काल नाशिकच्या दारणातून रात्री १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.