Thursday, October 17, 2024
Homeनगरढिसाळ व्यवस्थेचे निष्पाप बळी, जिल्ह्याच्या हद्दीचं त्रांगडं

ढिसाळ व्यवस्थेचे निष्पाप बळी, जिल्ह्याच्या हद्दीचं त्रांगडं

कमालपूर बंधार्‍याच्या दुरवस्थेमुळे तिघांचा पाण्यात पडून मृत्यू

टाकळीभान | Takalibhan

जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे कठडे नसलेल्या कमालपूर येथील कोल्हापूर बंधार्‍याच्या मोठमोठ्या खड्ड्यांच्या पुलावरून प्रवास करणारी दुचाकी खड्ड्यात आदळून पाण्यात पडल्याने अदिवासी समाजाच्या तीन निष्पाप मजुरांचा बळी गेला आहे. यापूर्वीही या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झालेले असले तरी जलसंपदाची मालकी असलेल्या ढिसाळ व्यवस्थेत सुधारणा झाली नसल्याने आणखी किती निष्पाप बळी ही व्यवस्था घेणार हाच खरा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागातील कमालपूर येथील गोदावरी नदीवर कोल्हापूर बंधारा बांधण्यात आलेला आहे. या बंधार्‍याच्या भिंतीचा पुलाप्रमाणे वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. अवजड वाहतूक होत नसली तरी दुचाकी व चारचाकी वाहन या पुलावरून सतत ये-जा करीत असल्याने संभाजीनगरच्या वैजापूर व गंगापूर तालुक्यांना जोडणारा हा पूल महत्त्वाचा दुवा ठरलेला आहे. त्यामुळे गंगापूर व वैजापूर तालुक्याचे मोठे दळणवळण श्रीरामपूर तालुक्याशी जोडले गेलेले आहे. गोदावरीच्या पैलतिरावरील अनेक गावांना श्रीरामपूरची बाजारपेठ अंतराने जवळची असल्याने या बंधार्‍याच्या पुलावरून नेहमीच मोठी वर्दळ सुरू असते. हा बंधारा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने जलसंपदाने निगराणीसाठी कर्मचार्‍याची नियुक्तीही केलेली आहे.

या पुलावरून पदचारी, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठमोठी वर्दळ होत असली तरी गेली कित्येक वर्षे हा पूल लोखंडी कठड्याशिवाय उभा आहे. गोदावरी नदीला येणार्‍या पुराच्या पाण्याखाली हा पूल नेहमीच जात असल्याने अनेकदा वाहतूक बंद होत असते. तरी कधी-कधी गुडघाभर पाण्यातून जीव मुठीत धरुन ये-जा सुरू असते. पुलाला कठडे नसल्याने व पुलावर पडालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकिस्वार खड्ड्यात आदळून खाली पडल्याने अपघात झालेले आहेत. काहींना जीव गमवावा लागलेला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. एवढं सगळं होऊनही जलसंपदाच्या ढिसाळ कामकाजाने आजपर्यंत पुलाला लोखंडी कठडे बसवण्याचे औदार्य दाखवलेले नाही.

नुकतेच ऐन दसरा सणाच्या सायंकाळी मोलमजुरी करून घराकडे येणार्‍या आदिवासी समाजाच्या दोन तरुणांचा व एका वृध्द महिलेचा पुलावरील खड्ड्यामुळे पुलावरून नदीपात्रातील पाण्यात पडल्याने करुण अंत झाला. सुदैवाने चौथ्याला वाचवण्यात तेथील मच्छीमारांना यश आले. या घटनेमुळे जलसंपदा विभागाच्या ढिसाळ व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप खदखदत आहे. पुलाला लोखंडी कठडे असते तर तीन निष्पाप आदिवासींना आपला जीव गमवावा लागला नसता हे वास्तव आहे. मात्र, हे ढिसाळ व्यवस्थेचे बळी ठरले आहेत. आता तरी जलसंपदा विभागाने जागं होऊन या बंधार्‍याच्या पुलाला लोखंडी कठडे बसवून भविष्यातील दुर्घटना टाळावी, असा आशावाद नागरीकांमधून व्यक्त केला जात आहे.

पुलाच्या सिमावादाचं त्रांगडं
हा गोदावरी नदीपात्रातील कोल्हापूर बंधारा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यांच्या सिमेवर आहे. बंधार्‍याला एकूण 52 मोर्‍या असून श्रीरामपूर तालुक्याची 34 मोर्‍यांची हद्द आहे. तर उर्वरीत 18 मोर्‍या या वैजापूर तालुक्याच्या हद्दीत येतात. त्यामुळे अशी एखादी दुर्घटना झाली तर हद्दीवरून टोलवाटोलवी केली जात असल्याने मदत कार्याला विलंब होतो. त्यामुळे सिमावादाचं हे त्रांगडं अधिकच अडचणीचं ठरत आहे. त्यावर उपाययोजना गरजेची आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या