Tuesday, March 25, 2025
Homeनगरतुटीच्या खोर्‍यातील प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा

तुटीच्या खोर्‍यातील प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा

महाराष्ट्र पाणी परिषदेच्या सदस्यांची बैठकीत मागणी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील तुटीच्या खोर्‍यात पाणी आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर कार्यवाही सुरू झाल्याबद्दल महाराष्ट्र पाणी परिषदेने समाधान व्यक्त केले असून अनेक वर्ष रखडलेल्या तुटीच्या खोर्‍यातील प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षाही परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र पाणी परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत संपन्न झाली. या बैठकीस पाणी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. वाय. आर. जाधव, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डी. एम. मोरे, डी. वाय. नलगीकर, विवेक आपटे, आर. एम. लांडगे, अ‍ॅड. ए. एम. शेख, प्रा. एन. एम. पाटील, पाणी परिषदेचे निमंत्रक प्रा. बी. जी. भांगरे, उत्तमराव निर्मळ, प्रा. जी. एम. पोंदे, पी. आर. खर्डे आणि जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र पाणी परिषदेने तयार केलेल्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले.

- Advertisement -

परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ.वाय. आर. जाधव यांनी स्व. विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदेच्या माध्यमातून तुटीच्या खोर्‍यांबाबत अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीयदृष्ट्या 19 प्रस्ताव तयार केले. याची माहिती केंद्र आणि राज्य सरकारला सादरीकरणाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात आली. नदीजोड प्रकल्पाचे प्रमुख सुरेश प्रभू आणि राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेतही या प्रस्तावांचे सादरीकरण झाल्यानंतर पाच ते सहा प्रस्तावांवर काम सुरू झाले आहे. हे स्व. विखे पाटील यांच्या पाठपुराव्याचे यश ठरले असल्याचे जाधव म्हणाले.

केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्पाला विशेष प्राधान्य दिले आहे. याबाबत परिषदेच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करतानाच पाणी परिषदेच्या अन्य प्रस्तावांवर कार्यवाही सुरू केली असेल तर हे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्यादृष्टीने प्रयत्न असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर या प्रकल्पांबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा सकारात्मक दृष्टीकोन असल्याने हे प्रकल्प पूर्ण होण्याच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, असे मत जाधव यांनी व्यक्त केले. जलसंपदा विभागाचे अभियंता प्रकाश मिसाळ यांनी बैठकीत महाराष्ट्र पाणी परिषदेने अतिशय अभ्यासपूर्ण रितीने सादर केलेले प्रस्ताव आणि यासाठी घेतलेले कष्ट कुठेही वाया गेलेले नाहीत.

आकडेवारीत थोडेफार बदल होतील, पण याच धर्तीवर विभागाने प्रकल्पांवर काम सुरु केले आहे. या तुटीच्या खोर्‍यातील सुमारे 250 प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता घेऊन कार्यवाही सुरू झाली आहे. पाण्याच्या उगमापासून ते प्रवाहापर्यंत अतिरिक्त पाणी या तुटीच्या खोर्‍यात वळविणे हा विभागाचा प्राधान्यक्रम आहे. कृष्णा, गोदावरी, तापी आणि कोकण या सर्वच विभागात या पध्दतीने योजनांची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही भागात वन विभागाच्या असलेल्या अडचणी समन्वयातून सोडवण्यासाठी विभागाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी आश्वासित केले.

बैठकीत प्रारंभी महाराष्ट्र पाणी परिषदेचे निमंत्रक प्रा. बी. जी. भांगरे यांनी पाणी परिषदेच्या प्रस्तावांचा आढावा घेतला. या बैठकीत माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, डी. एम. मोरे यांच्यासह अन्य ज्येष्ठ सदस्यांनी आपली मतं मांडली. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची जलसंपदा विभागाचे मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल परिषदेच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...