शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करतानाच निळवंडे धरणाच्या वितरकांचे काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल ,अशी ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्रिपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना.विखे पाटील यांनी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात येऊन दर्शन घेतले. संस्थानच्यावतीने तसेच सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, भाजपाचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे, प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, वैभल कलुबर्मे यांनी स्वागत करून सत्कार केला. माध्यमांशी बोलताना ना.विखे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या जबाबदारीचे आव्हान मोठे असले तरी त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्याचे यशस्वी काम आपण करणार आहोत.
गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व आता आपल्यावर आले आहे. हे काम खूप मोठे आहे पण केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्यासाठी महायुती सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले. महायुती सरकारच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम पूर्ण होवू शकले.
दोन्ही कालव्याच्या माध्यमातून जिरायती भागाला पाणी मिळवून दिले असले तरी अजून वितरकांची काम पूर्ण करायची आहे. आता जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्याने ही काम पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. कृष्णा खोरे हा सुध्दा मोठा विभाग असून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा जिल्ह्यातील गावात दुष्काळी परीस्थिती आहे. त्यामुळे या गावांना पाणी देणे हे सुध्दा मोठे काम आपल्याला करायचे असून या पट्ट्यात असलेल्या जिल्ह्यांचे पाणी प्रश्न सोडविण्याकरिता काम करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.