राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
महाराष्ट्र शासनाने सन 2025-26 चे अंदाजपत्रक नुकतेच जाहीर केले आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री यांच्या जलसंपदाच्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. नगर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पुरेशा निधीअभावी रेंगाळले होते वा बंद पडले होते. परंतु विद्यमान अर्थसंकल्पात ना. विखे पाटील यांनी विविध प्रकल्पांसाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून प्रकल्प मार्गी लावण्याचा संकल्प केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित निळवंडे प्रकल्पासाठी अंदाजपत्रकीय तरतूद 265 कोटी असून नाबार्डमार्फत 235 कोटी अशी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तुटीच्या गोदावरी खोर्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे, दारणा, गंगापूर प्रकल्पात वैतरणा उल्हास खोर्यातील पाणी उपसा वळण योजनांद्वारे वळविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यासाठी 10 कोटींची तरतूद केली आहे.
गोदावरी कालव्यांना वरदान ठरणार्या वैतरणा धरणातून मुकणे धरणात पाणी वळविण्यासाठी दरवाजे बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली असून एका वर्षात पहिल्या टप्प्यात सरासरी चार ते पाच टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भविष्यात 16.5 टीएमसी पाणी वळविणे प्रस्तावित आहे. पश्चिमेचे पाणी पुर्वेला वळविण्यासाठी चालू असलेल्या 10 प्रवाही वळण योजनांसाठी 75 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नव्याने मंजूर केलेल्या कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड प्रवाही वळण योजनांसाठी 32 कोटींची तरतूद केली आहे. ताजनापूर टप्पा – 2 उपसा योजनेसाठी 10 कोटींची तसेच वीजबील व दुरुस्तीसाठी 1.3 कोटींची तरतूद केली आहे. मुळा प्रकल्पाच्या वांबोरी चारीसाठी 55 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुळा प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्याची विशेष दुरुस्ती, धरण माथा व महामार्ग पोहच रस्ता इत्यादी कामांसाठी 32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या तसेच वितरिकांच्या विशेष दुरुस्तीसाठी आणि पाईपसाठी 13 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भंडारदरा प्रकल्पांतर्गत प्रवरा डावा व उजवा कालवा विशेष दुरुस्ती तसेच आढळा प्रकल्पासह एकूण 16.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दमणगंगा एकदरे गोदावरी उपसा वळण योजना तसेच दमणगंगा वैतरणा गोदावरी उपसा वळण योजनेसाठी 2 कोटींची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. एकंदरित उपरोक्त आर्थिक तरतुदी पाहता अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे, दारणा गंगापूर प्रकल्पातील मूळकामे तसेच विशेष दुरुस्तीची कामे सर्वार्थाने मार्गी लागतील असे चित्र आहे. अर्थसंकल्पातील समाधानकारक तरतुदीमुळे लाभधारकांत समाधानाचे वातावरण आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने विविध भरघोस आर्थिक तरतूद झाली असून प्रशासकीय पातळीवरून कामांना गती देणे आवश्यक आहे. निळवंडे प्रकल्पाची वितरण व्यवस्था तसेच अस्तरीकरणाची कामे वेगाने पूर्ण करुन शेवटच्या शेतकर्यांपर्यंत लवकरात लवकर पाणी पोहचेल असे नियोजन करावे. मुळा वांबोरी चारी, ताजनापूर उपसा योजना पश्चिमेचे पाणी पुर्वेला गोदावरी खोर्यात वळविणार्या योजना पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे. भंडारदरा, मुळा तसेच गोदावरी कालव्यांच्या तसेच वितरिकांच्या विशेष दुरुस्तीने सिंचन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढेल अशी आशा आहे.
-उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग