Wednesday, May 22, 2024
Homeनगरहक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ

हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष अटळ

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, हक्काचे पाणी वाचविण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. जनतेमध्ये जागृती निर्माण करून पाण्यासाठी जनआंदोलन उभे करावे लागेल. नाशिक आणि नगर जिल्ह्याला राजकीय जोडे बाजूला ठेवून पाण्यासाठी एक व्हावे लागेल, असे मत युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

गणेश सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शेतकरी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, डॉ. एकनाथ गोंदकर, शिवाजी लहारे, गंगाधर चौधरी आदींसह संचालक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अन्यायकारक असलेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार जायकवाडीला दहा टीएमसी पाणी नगर आणि नाशिक मधल्या धरणांमधून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे त्या संदर्भाने बैठकही आयोजित केली आहे. समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र राबवताना, एकाला न्याय आणि दुसर्‍यावर अन्याय अशी भूमिका घेता येणार नाही. नगर, नाशिक मधल्या शेतकर्‍यांची सध्याची स्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

यावर्षा सोबतच पुढील वर्षही दुष्काळाचे दिसते आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवांना स्वतःच्या हक्काचे पाणी वाचविण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी हक्काचे पाणी वाचविण्यासाठी ठराव केला आहे. विवेक कोल्हे पुढे असेही म्हणाले, पाण्याची उपलब्धता आणि धरणांची निर्मिती हे धोरणात्मक निर्णय आहेत. स्वर्गीय शंकरराव कोल्हे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नव्या धरणांच्या निर्मितीसाठी अनेक प्रयत्न केले. त्यातून पाण्याची उपलब्धताही झाली मात्र गोदावरी कालव्यावर आज पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण पडले आहे. अशावेळी शेतकर्‍यांवर अन्याय करणारा निर्णय होऊ नये ही अपेक्षा आहे असेही कोल्हे म्हणाले.

ज्ञानेश्वर वर्पे म्हणाले, एकीकडे निळवंडे कालव्यातून पाणी येत असल्याचा आम्हाला आनंद आहे, मात्र दुसरीकडे, हक्काचे पाणी दुसर्‍याला द्यावे लागणार आहे, याचे दुःखही आहे. पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. विठ्ठलराव शेळके म्हणाले, पाण्यावरचा पहिला हक्क नगर नाशिकचा आहे, अजून इथेच शेतकर्‍यांना पाणी मिळत नाही. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जर वेळेवर आवर्तन सुटले नाही तर इथल्या शेतकर्‍यांची परिस्थिती गंभीर होईल. गंगाधर शेळके यांनी शंकररावजी कोल्हे यांच्या पाण्याच्या आंदोलनाच्या संदर्भातील आठवणी जागवल्या, विवेक कोल्हे यांच्या रूपाने शंकरराव कोल्हे यांचा नातू आज पाण्याच्या आंदोलनासाठी पुढाकार घेतोय ही आमच्यासाठी समाधानाची बाब असल्याचे ते म्हटले.

दरम्यान मेंढेगिरी समितीच्या शिफारशींचा फेरविचार व्हावा, नगर नाशिक मधील शेतकर्‍यांची भावना शासनाने समजून घ्यावी, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्याच्या संदर्भाने शासनाने पुढाकार घ्यावा आणि पाण्याचे फेरवाटप जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडू नये अशा आशयाचे ठराव सचिन गुंजाळ यांनी मांडले, त्याला कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे आणि सभासदांनी अनुमोदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या