श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
भंडारदरा धरणातून सुटणार्या आवर्तनानुसार आणि साठवण तलावात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून प्रत्येक बुधवारी पाणी सोडण्याचा निर्णय श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे श्रीरामपूरकरांना संभाव्य पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान सर्व नागरिकांनी आपल्याला आठ दिवस पुरेल असे पाण्याचे नियोजन करावे आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून 15 डिसेंबरला सोडण्यात येणारे आवर्तन आता 1 डिसेंबरला सोडण्यास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे श्रीरामपूरकरांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. त्यानुसार शहराला आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार असा दोन दिवस पाणीपुरवठा केला जात होता पण काल श्रीरामपूर पालिकेने पुन्हा एकदा आठवड्यातून फक्त बुधवारी पाणी सोडले जाईल, असे जाहीर केल्याने श्रीरामपूरकरांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आठवड्यातून दोनदा पाणी सोडण्यात येणार असल्याच्या निर्णयानंतर विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आमच्यामुळे पाणी प्रश्न सुटला असे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती पण आता पुन्हा आठवड्यातून एकदा पाणी सुटणार असल्याने ही मंडळी काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




