Saturday, September 14, 2024
Homeनगर7 गावांच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 13 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

7 गावांच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 13 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या संगमनेर तालुक्यातील 7 गावांच्या पाणी पुरवठा योजनेकरिता 13 कोटी 49 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत या पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिली आहे. हर घर जल ही संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घरामध्ये पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. शिर्डी मतदार संघातही जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कार्यवाही सुरू झाली असल्याचे सांगतानाच या सर्व पाणीपुरवठा योजनांकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचेही विशेष सहकार्य लाभले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

प्रतापपूर, रहिमपूर, आश्वी बु, आश्वी खुर्द, दाढ खुर्द, निंबाळे आणि ओझर बुद्रुक या सात गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटावा म्हणून जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळावी म्हणून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या सर्व प्रस्तावांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या गावांतील पाणी योजनांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतापपूर येथील पाणीपुरवठा योजनेस 1 कोटी 99 लाख, रहिमपूर 2 कोटी, आश्वी बु. 2 कोटी, आश्वी खुर्द 2 कोटी, दाढ खुर्द 1 कोटी 99 लाख, निंबाळे 1 कोटी 52 लाख, ओझर बुद्रुक 1 कोटी 99 लाख अशा पध्दतीने या पाणी पुरवठा योजनेच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात होऊन या सर्व गावांमधील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळेल, पाण्याची समस्याही कायमस्वरुपी सुटेल, असा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या