लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
नांदूरमध्यमेश्वर धरणातून ( Nandurmdhyameshwar Dam ) लासलगाव-विंचूरसह ( Lasalgaon- vinchur ) 16 गावांना पाणीपुरवठा करणार्या योजनेचे सुमारे 71 लाख 30 हजार रु. वीजबिल ( Electricity bill ) थकल्याने वीज वितरण कंपनीने (Mahavitaran )सोमवारपासून या योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने ही पाणीपुरवठा योजना कोलमडून पडली आहे.
लासलगाव, विंचूरसह 16 गावांची तहान भागवणारी ही योजनेच्या जलवाहिनीचे गेल्या पाच ते दहा वर्षांपासून फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षापर्यंत या योजनेचे वीजबिल पाणीपुरवठा योजना 60 टक्के तर शासन 40 टक्के वीजबिल भरणा करत असे. परंतु आता वीजबिलचा संपूर्ण अधिभार ग्रामपालिकेसह पाणीपुरवठा योजनेवर टाकण्यात आल्याने या पाणीपुरवठा योजनेच्या चालू बिलापैकी 1 लाख 30 हजार हे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे वीजबिल थकले आहे
. तर नांदूरमध्यमेश्वर धरणावरील विद्युतपंपाचे वीजबिल 70 लाख रु. थकित झाले आहे. या बिलाबाबत वीज वितरणने पाणीपुरवठा योजना समितीकडे बिल वसुलीबाबत मागणी करूनही वीजबिल न भरल्यामुळे अखेरीस वीज वितरण कंपनीने 23 ऑगस्ट रोजी योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी 16 गाव पाणीपुरवठा योजना कोलमडून पडला आहे.अवलंबून असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या योजनेप्रमाणेच लासलगाव येथील स्ट्रीट लाईटचे 5 लाख 52 हजार 470 रु. वीजबिल थकल्याने वीज वितरण कंपनीने स्ट्रीट लाईटचादेखील वीजपुरवठा खंडित आहे.
अंधाराचे साम्राज्य
सध्या पावसाळ्यात नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी ओसंडून वाहत असतानाही केवळ वीजबिल थकल्याने वीज वितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने सोमवारपासून या योजनेतील 16 गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात लासलगाव, विंचूरसह 16 गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना आशिया खंडातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव शहरातील स्ट्रीट लाईटदेखील बंद पडले आहेत. शहरातील स्ट्रीट लाईटचे वीजबिल थकल्याने वीज वितरणने येथेही आपला दणका दाखवला आहे. त्यामुळे सायंकाळी लासलगाव शहरातील संपूर्ण रस्ते अंधारात गडप होत असून या वीजबिल प्रकरणी शासनस्तरावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.