अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणार्या मुळा धरणातील पाणीसाठा (Mula Dam Water Storage) कडक उन्हामुळे बाष्पीभवन होऊन कमी-कमी होत असताना दुसरीकडे नगर शहरात पाईपलाईन लिकेजच्या घटना वाढू लागल्याने ऐन पाणीटंचाईत पाणी गळतीचे संकट दिसू लागले आहे. सावेडीत मागील दोन दिवसात पाणी गळताीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. मनपाने (Ahmednagar Municipal Coprporation) तातडीने दुरुस्ती सुरू केली असली तरी अन्य ठिकाणचे पाईपलाईन लिकेज शोधून तातडीने त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.
नगर-मनमाड महामार्गावर सावेडी बसस्थानकाशेजारील (Savedi Bus Stand) मिडास सुझुकी शो-रूमसमोर मुख्य पाईपलाईन फुटल्याने मागील दोन दिवसात हजारो लिटर पाणी महामार्गावरून वाहत होते. काही ठिकाणी पाण्याची डबकीही तयार झाली होती. याचवेळी सावेडी बसस्थानकामागील शाहूनगर परिसरातील पाईपलाईनही फुटल्याने तेथील रस्त्यावरून पाण्याचा अखंड प्रवाह वाहत होता. या रस्त्याला असलेल्या खड्ड्यांतून पाण्याचे डोह साठले होते. परिसरातील नागरिकांनी मनपाला माहिती कळवल्यावर बुधवारी सकाळी सुझुकी शो-रूमसमोरील लिकेज दुरुस्ती सुरू करण्यात आली.
जेसीबीने खोदकाम करून पाईपलाईनची डागडुजी सुरू होती. त्यामुळे सावेडी परिसरातील पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. ही दुरुस्ती सुरू असताना त्याच्या पाठीमागे असलेल्या शाहूनगर परिसरातील पाईपलाईनची दुरुस्ती मात्र सुरू केली गेली नाही. त्यामुळे सुझुकी शो-रुमजवळील पाईपलाईन नीट झाली तरी आतील शाहूनगरची पाईपलाईन वाहतीच राहणार आहे.
तेथे अखंड वाहते पाणी
पाईपलाईन रोडवरील पद्मालय पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर असलेल्या प्रियदर्शन हॉटेलसमोर पाईपलाईनची गळती गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. येथे कायम पाण्याचे डबके असते. तेथील पाणी गळती चक्क दोन इंची पाईपने पाणी भरता येईल, एवढी मोठी आहे. अनेकजण येथे येऊन जार व पाण्याच्या टाक्या भरून नेतात. सकाळी तर अनेक दूध व्यावसायिक दुधाचे कॅन येथे स्वच्छ करून घेतात. परिसरातील पाळीव जनावरे व मोकाट कुत्रीही येथे पाणी पिण्यासाठी येतात. ही पाणी गळती रोखण्यावर मनपाला अद्याप उपाय सापडलेला नाही. या पाणी गळतीच्या परिसरात गवत व झाडीझुडुपेही आता उगवली आहे.
मुळा धरणात नगर शहराच्या वाट्याचे पाणी पुरेसे असले तरी उन्हाळ्याची तीव्रता पाहता शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. मागील शनिवारी वीज दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा दोन-तीन दिवस विस्कळीत झाला. आता नवे संकट पाणी गळतीचे उदभवू लागले आहे. त्यामुळे मनपाने तातडीने पाणी गळतीच्या ठिकाणी दुरुस्ती कामे सुरू करण्याची गरज आहे.