पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. टाकीच्या ढीगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यातील दोन ते तीन जण दगावले असण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल, पिंपरी- चिंचवड पोलीस दाखल झाले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ३ बिगारी कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याठिकाणी मोठी गर्दी जमली आहे.
तात्पुरत्या स्वरूपाची सोय म्हणून बांधलेली पाण्याची टाकी अचानक कोसळली, या दुर्घटनेत ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. आज (गुरूवारी) सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तर या ठिकाणी असलेल्या इतर कामगारांनी आणि प्रत्यक्षदर्शींंनी ही घटना टाकी नुकतीच बांधली असून त्यात पाणी भरल्याने टाकी कोसळून दुर्घटना झाल्याचे म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा