अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पाऊस लांबल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 54 गावे व 271 वाडी-वस्तीवरील 99 हजार 7 लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस वेळेत न पडल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा उन्हाळ्यात टंचाईजन्य स्थिती जाणवली नाही. परिणामी पाण्याच्या टँकरची संख्याही मर्यादित राहिली. जूनमध्ये पाऊस पडल्यास पाण्याची कमतरता भासत नाही. परंतु, यंदा पूर्ण जून महिना संपला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 87 हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिलपर्यंत एकही टँकर जिल्ह्यात सुरू नव्हता. थेट 18 एप्रिलला संगमनेर व अकोले तालुक्यात प्रत्येकी एक टँकर सुरू झाला. त्यानंतर मे व आता जूनमध्ये टँकरची संख्या वाढली. 12 जूनपर्यंत टँकरची संख्या 16 होती. ती आता 47 झाली आहे.
जिल्ह्यात टंचाई काळात जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने 7 कोटी 37 लाख रुपयांचा टंचाईकृती आराखडा तयार केला होता. यात पाण्याच्या टँकरसाठी 6 कोटी 32 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. उर्वरितमध्ये बुडक्या खोदणे, सार्वजनिक विहिरीचे खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, ज्याठिकाणी पाण्याचा टँकर पोहचत नाही, अशा ठिकाणी बैलगाडीव्दारे पाणी पुरवठा करणे, विशेष नळ जोडणी मोहीम, तात्पुरत्या नळ योजनांची दुरूस्ती आणि विंधन विहिरींच्या दुरूस्ती आदी उपाययोजनांसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली होती.
34 खासगी टँकर
47 पैकी 12 ठिकाणी शासकीय टँकरने, तर 35 ठिकाणी खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस लांबला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 5 तालुक्यांतच टँकर सुरू आहेत. पावसाने असाचा ताण दिल्यास पाणी टंचाई निर्माण होणार्या तालुक्यांची संख्या वाढू शकते. दुसरीकडे जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात धो-धो पाऊस पडत आहे.
सर्वाधिक टँकर पारनेर तालुक्यात
जिल्ह्यात सुरू असलेल्या 47 पैकी सर्वात जास्त 17 टँकर पारनेर तालुक्यात सुरू आहेत. त्यानंतर 10 टँकर संगमनेर तालुक्यात, 10 टँकर पाथर्डी तालुक्यात, 9 टँकर नगर तालुक्यात, तर 1 टँकर अकोले तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 54 गावे व 271 वाडीवस्त्यांवरील 99 हजार 7 ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागत आहे.