Saturday, July 27, 2024
Homeनगरपावसाच्या विश्रांतीमुळे नगरसह राज्यात पाणी चिंता

पावसाच्या विश्रांतीमुळे नगरसह राज्यात पाणी चिंता

राज्य सरकारकडून नियोजनाच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी)

- Advertisement -

राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवारीपासून पावसात खंड पडला आहे. त्यामुळे पावसाने आणखी काही काळ विश्रांती घेतली तर राज्याला पुढील काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पाऊसपाणी आणि खरीप हंगामातील पेरणीचा आढावा घेण्यात आला. पुढील काही दिवसांत हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने कृषी तसेच महसूल आणि संबंधित विभागांनी नियोजन करावे. चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

कृषी विभागाने बैठकीत दिलेल्या माहितीनुसार राज्यात १३९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले ६ जिल्हे असून, ७५ ते १०० टक्के पाऊस झालेले १३ जिल्हे आणि ५० ते ७५ टक्के पाऊस झालेले १५ जिल्हे आहेत. राज्यात २५ ते ५० टक्के पाऊस झालेले १३ तालुके आहेत. सध्या राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१.९० टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९० टक्के पाणी साठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७ टक्के, अमरावती ६६.५७ टक्के, औरंगाबाद ३१.६५ टक्के, नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण ८७.२५ टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. आजच्या घडीला राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु आहेत.

नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील पिके तहानलेली

अहमदनगर (प्रतिनिधी)

सुमारे दीड महिन्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सहा लाख ४६ हजार हेक्टवरवरील पिके तहानली आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके वाया जाण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या आता नजरा पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासन देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून चारा टंचाईसह हंगामातील पिकांना कशा पध्दतीने पाणी उपलब्ध करून देता येईल, धरणातून तातडीने आवर्तन कसे सुटले यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, पावसाने खंड दिल्याने आता शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीच्या पावसावर काही प्रमाणात पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला. त्यानंतर टप्प्याने जसजसा पेरणीलायक पाऊस झाला, त्यानुसार खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या झाल्या. यंदा कृषी विभागाच्या नियोजनानुसार खरीप हंगामातील पिकांच्या शंभर टक्के पेरण्या होण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची वाट पाहावी लागली. त्यानंतर देखील जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आता पाऊस होईल, नंतर पाऊस होईल, अशा भाबड्या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आलेली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कपाशी पिकाची १ लाख ४३ हजार ९१० हेक्टरवर (११७ टक्के) क्षेत्रात लागवड झालेली आहे, तर सोयाबीनची १ लाख ७३ हजार हेक्टर (१९९ टक्के), सूर्यफुलाची १४६ हेक्टर (४६ टक्के), बाजरीची ८० हजार ६२३ हेक्टर (५३ टक्के), कडधान्यांच्या १ लाख ४४ हजार १७४ हेक्टर (१०९ टक्के), उडीद ४८ हजार ७३१ हेक्टर (१२० टक्के), मूग २९ हजार ५५ हेक्टरवर (६२ टक्के), तूर ६१ हजार ३०० हेक्टर (१६९.९८ टक्के) आणि मका ८२ हजार २६६ (१३५ टक्के) हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. या पिकांना सध्या पावसाची आवश्यकता असून लवकर पाऊस न झाल्यास या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

राज्यात यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यामुळे सुरुवातीलाच पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, होणाऱ्या पावसानूसार शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांसह प्रशासनाची स्थिती खराब झाली आहे. जिल्हा प्रशासन परिस्थिवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यातील पशूधनाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातून चारा बंदी घालण्यात आली आहे. यासह टंचाईकृती आरखड्याला या महिनाअखेरपर्यंत मुदत वाढण्यात आली आहे. पाऊस आणखी लांबल्यास ही मुदत वाढवण्याच्या विचार प्रशासन आहे. हवामान खात्यासह सर्व अंदाज फेल

जिल्ह्यातील हवामान आणि होणाऱ्या पावसाबद्दल भारतीय हवामान खात्यासह सर्व हवामान तज्ज्ञांचा अंदाज फेल ठरला आहे. नगर, पुणे जिल्ह्यातील काही भाग, सोलापूर जिल्ह्यातील काही भाग असा राज्यातील एका मोठ्या पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा असून यंदा एलनिनोचा प्रभाव होणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचा प्रभाव दिसत असल्याची शंका खरी होतांना दिसत आहे. आता सर्व भिस्त परतीच्या पावसावर असून त्या पावसाने चकवा दिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या