Monday, June 24, 2024
Homeनगरपाणलोटात पाऊस, मात्र लाभक्षेत्र कोरडे

पाणलोटात पाऊस, मात्र लाभक्षेत्र कोरडे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर जिल्ह्यातील शेतीचे भवितव्य आणि आर्थिक कणा अवलंबून असलेल्या भंडारदरा, निळवंडे, मुळा, दारणा, गंगापूर तसेच कुकडी पाणलोटात तब्बल 15- 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने लाभक्षेत्रातील दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी तसेच अकोलेतील मुळा नदीतील पाणी वाढू लागले आहे. मुळा वगळता आता हे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. काही दिवस पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास नगर-नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याच्या संकटातून सुटका होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांत पाऊस नसल्याने दुष्काळाचे सावट आहे. उत्तरेपेक्षा दक्षिणेत भीषण परिस्थिती आहे.

भंडारदरा, अकोले (प्रतिनिधी)- उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायी असलेल्या भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने तुडूंब असलेल्या धरणात नवीन पाण्याची आवक वाढल्याने या धरणातून काल रविवारी सायंकाळी 7698 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठाही तासागणिक वाढल्याने या धरणातूनही सायंकाळी 7678 क्युसेकने प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गत आठवड्यापूर्वी पाणलोटात पावसाने काढता पाय घेतला होता. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण होते.

पण गत पाच दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने भंडरदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले. पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत पावसाची सरी तांडव नृत्य करू लागल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे डोंगरदर्‍यांवरील धबधबे पुन्हा आक्राळ विक्राळ रूप धारण करू लागले आहेत. ओढे नाल्यांना पूर आला असून हे पाणी धरणात विसावत आहे. परिणामी धरणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 366 दलघफू पाणी आले. त्यानंतरच्या बारा तासांत 271 दलघफू पाणी आले. म्हणजेच गत 36 तासांत तब्बल 637 दलघफू पाणी आले. ते सर्व पाणी निळवंडे धरणात जमा झाले. काल भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग 4295 होता. तो आता 7678 क्युसेक करण्यात आला आहे. आता विसर्ग वाढल्याने तसेच पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास निळवंडे धरणातील पाणी पातळी कायम ठेवण्यात येऊन या धरणातूनही सायंकाळी 7678 क्युसेकने प्रवरा नदी पात्रात सुरू आहे निळवंडेत 7112 दलघफू (85.39) पाणीसाठा आहे.

पाणलोटात कालही पावसाचा जोर आणखी वाढलेला होता. दिवसभरात पडलेल्या भंडारदरातील पावसाची नोंद 30 मिमी झाली आहे. भंडारदरात पाऊस वाढल्याने वाकी तलावातूनही विसर्ग 556 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे निळवंडेत नवीन पाण्याची जोरदार आवक होत आहे. अकोले येथील अगस्ति सेतू पूल पाण्याखाली गेला आहे. काल दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. भंडारदरा ते निळवंडे धरण दरम्यानचे ओढे नाले तसेच कृष्णवंती नदीलाही चांगले पाणी आले आहे.हे सर्व पाणी रंधा धबधब्या जवळ निळवंडे धरणात पडते.या पाण्यामुळे रंधा धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.सुकू लागलेल्या खरीप पिकांना त्या मुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

कुकडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांवर

कुकडी पाणलोटात पावसाचा फारसा जोर नसलातरी धिम्या गतीने का होईना कुकडी समूह धरणांतील पाणीसाठा आज 75 टक्क्यांवर पोहचणार आहे. काल सायंकाळी या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 22018 दलघफू झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. या समूहातील सर्वाधिक क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 92 टक्के झाला आहे. डिंभेचा कालवाही सुरू आहे.

मुळा 82 टक्के, आवक वाढली

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणाकडे होणारी आवक वाढली आहे. शनिवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 20972 दलघफू झाला होता. तो रविवारी सायंकाळी तो 21298 दलघफू होता. रात्री तो च्या 21332 दलघफूवर पोहचला होता.कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग काल सकाळी 2984 क्युसेक होता. तो सायंकाळी 3416 क्युसेकवर पोहचलाहोता.

- Advertisment -

ताज्या बातम्या