मनोरंजन व्यवसायात योगदान देणार्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणार्या वेव्हज शिखर परिषद आणि व्हेज बाजाराविषयी
भारत हा मनोरंजन आणि माध्यम उद्योग जगतातला एक आघाडीचा आणि तितकाच महत्त्वाचा देश. भारतात या उद्योग क्षेत्राची प्रगतीही तितक्याच झपाट्याने होत आहे आणि त्यासोबतच या परिसंस्थेच्या अवकाशात सातत्याने होत असलेल्या बदलांसह हे क्षेत्रही तितक्याच सातत्यपूर्णतेने बहरत चालले आहे. आज या क्षेत्राकडे नीट पाहिले तर विविध व्यासपीठांवरच्या आशय निर्मितीनेही मोठी उसळी घेतल्याचे दिसते. यामागचे कारण म्हणजे देशातील वाढत्या डिजिटल प्रसारण सेवा, प्रादेशिक भाषांमधील आशय सामग्री निर्मिती आणि सातत्याने नव्या, खिळवून ठेवणार्या, सर्वसमावेशकतेची जाणीव करून देणार्या आशयाची वाढती मागणी करत असलेला देशातला तंत्रज्ञानस्नेही प्रेक्षक वर्ग. त्यामुळेच तर आता भारतासाठी हे क्षेत्र केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून मर्यादित राहिलेले नसून, हे भारतासाठी सांस्कृतिक अभिव्यक्ती, आर्थिक विकास आणि जागतिक पटलावर आपला प्रभाव पाडण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम झाले आहे.
लवकरच मुंबईत जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World -Audio Visual Entertainment Summit – WAVES) होणार आहे. येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान महाराष्ट्रात, मुंबई इथे ही शिखर परिषद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेच या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद जागतिक पटलावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतिबिंब असलेला एक मंच ठरणार आहे आणि वेव्हज बाजार हा या शिखर परिषदे अंतर्गतचाच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खरे तर गेल्या अनेक दशकांपासून मी या क्षेत्रातच जगतो, वावरतो आहे. या इतक्या प्रदीर्घ काळातील माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो ती म्हणजे कथात्मक मांडणीत लोकांना एकत्र आणण्याची, त्यांना प्रेरित करण्याची आणि एकुणात परिवर्तन घडवून आणण्याची मोठी ताकद असते. याच पार्श्वभूमीवर वेव्हज आणि वेव्हज बाजाराच्या माध्यमातून भारताने जागतिक मनोरंजन क्षेत्रासाठी एका व्यापक सहकार्यपूर्ण भागीदारीचे आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
खरे तर वेव्हज बाजार ही ऑनलाइन बाजारपेठेसाठी आखली गेलेली एक क्रांंतिकारक संकल्पना आहे. ही ऑनलाइन बाजारपेठ म्हणजे जागतिक मनोरंजन परिस्थिती अंतर्गतचे व्यावसायिक तज्ज्ञ, उद्योग – व्यवसाय, आणि कलाकारांना परस्परांसोबत जोडून देणारे माध्यम ठरणार आहे. या बाजारपेठेअंतर्गत या क्षेत्रातील परस्पर सहकार्य सुलभ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे. याद्वारे या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञांना नव्या संधी शोधण्याची आणि सहकार्यपूर्ण भागीदारी स्थापित करण्याची संधी मिळणार आहे. या बाजारपेठेला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील एक अभिनव व्यवसाय केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचाच सरकारचा प्रयत्न आहे. भारताचे माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 27 जानेवारी 2025 रोजी या अभिनव बाजारपेठेचे औपचारिक उद्घाटन केले होते. आर्थिक क्षेत्रात दावोस शिखर परिषदेचे स्थान आहे, तेच मनोरंजन क्षेत्रात वेव्हज शिखर परिषदेला मिळवून देण्याचा दृष्टिकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. त्या दृष्टीने वेव्हज बाजार महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
वेव्हज बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळावर आतापर्यंत, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित विविध क्षेत्रांंमधील सुमारे 5,500 खरेदीदार, 2,000 पेक्षा जास्त विक्रेते आणि जवळपास 1,000 प्रकल्पांसाठी नोंदणी केली गेली आहे. भविष्यात या संकेतस्थळाला माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठीच्या आशय सामग्रीची एक सर्वसमावेशक बाजारपेठ आणि परस्पर संपर्काच्या केंद्राचे स्वरूप प्राप्त करून देणे हा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीनेच संकेतस्थळाला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोफाइलिंग म्हणजेच त्या त्या व्यक्तींची व्यावसायिक ओळख करून देण्याची तसेच मागणीनुसार जुळवणी करून देण्याच्या तंत्रज्ञानाचीही जोड दिली गेली आहे. या माध्यमातून ऑनलाइन संकल्पना मांडण्याचे सत्र, ऑनलाइन बीटूबी बैठका (विविध व्यावसायिक प्रतिनिधींच्या बैठका), वेबिनार या आणि अशाच प्रकारच्या इतर महत्त्वाच्या सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.
ही बाजारपेठ म्हणजे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या अवकाशातील चित्रपट, दूरचित्रवाणी, अॅनिमेशन, गेमिंग, जाहिरात, वर्धित वास्तव (एक्स्टेंडेड रिअॅलिटी), संगीत, ध्वनी संयोजन, नभोवाणी या आणि अशा विविध क्षेत्रांमधील भागधारकांना एकत्र आणणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. हे व्यासपीठ विक्रेते आणि खरेदीदारांतील दुवा ठरेल आणि त्याद्वारे व्यावसायिकांना आपली कौशल्ये सुलभतेने सादर करण्याची, त्यांच्या संभाव्य ग्राहकांसोबत थेट संपर्क साधण्याची आणि उपयुक्त सहकार्यपूर्ण भागीदारीची संधी उपलब्ध करून देत राहील.
एखादा चित्रपट दिग्दर्शक आपल्या चित्रपटासाठी निर्मिती भागीदाराच्या शोधात असेल, एखादा जाहिरातदार योग्य व्यासपीठाच्या शोधात असेल, एखादा गेम डेव्हलपर गुंतवणुकदाराच्या शोधात असेल किंवा एखादा कलाकार आपल्या कलाकृतींना जागतिक स्तरावरील प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित असेल, तर अशा सर्वांसाठी वेव्हज बाजारपेठेचा हा मंच म्हणजे परस्पर संपर्क, सहकार्य आणि व्यवसायवृद्धीचे बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मोठी जागा किंवा बाजारपेठ असणार आहे.
एका अर्थाने वेव्हज बाजार ही एकप्रकारची समन्वित बीटूबी बैठकांची अभिनव बाजारपेठ आहे, जिने जागतिक मनोरंजन क्षेत्रातील परस्पर संपर्क व्यवस्था, परस्पर सहकार्यपूर्ण भागीदारी व्यवस्था आणि विकासाचा संपूर्ण चेहरामोहरा अगदी क्रांतिकारकरित्या बदलला आहे. या बाजारपेठेने चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, जाहिरात तसेच वर्धित वास्तव (एक्स), आभासी वास्तव (व्हीआर) यांसारख्या जिवंत अनुभूती देणार्या तंत्रज्ञानाशी संबंधित तज्ज्ञ व्यावसायिकांना एकत्र आणणारा मंच उपलब्ध करून दिला आहे आणि याद्वारे विविध सर्जनशील क्षेत्रांसाठीच्या आशय सामग्रीचे सूचीकरण, त्याचा शोध आणि संबंधित व्यवहारांसाठीचाही एक व्यापक मंच उपलब्ध झाला आहे. चित्रपट वितरणासाठीचा मंचाच्या शोधात असलेले निर्माते, नव्या संकल्पना मांडू पाहणारे गेम डेव्हलपर किंवा लायसन्सिंग संधींच्या शोधात असलेले साऊंड डिझायनर अशा सगळ्यांसाठी वर्गवारीनुसार सूचीकरण, सुरक्षितपणे सादरीकरणे पाहण्याची दालने आणि संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देत ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करणारी बाजारपेठ म्हणून वेव्हज बाजार उदयाला येणार आहे.
या बाजारपेठेच्या माध्यमातून भौगोलिक मर्यादांच्या पलीकडे जात विक्रेते आणि खरेदीदारांना त्यांच्यासाठीचा योग्य भागीदार आणि संधी शोधण्याच्या दृष्टीने सक्षम करणार्या सुविधांचा अंतर्भाव केला आहे. चित्रपट स्टुडिओ, अॅनिमेशन हाऊस, पॉडकास्ट निर्माते, मार्केटिंग यंत्रणा यांसारख्या विक्रेत्यांना आपल्या सेवा आणि त्यांच्याकडची आशय सामग्री जागतिक गुंतवणुकदार, वितरक आणि भागीदारांसमोर सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे खरेदीदारांसाठीदेखील उच्च गुणवत्तेचे, आधुनिक काळाशी सुसंगत प्रकल्प या बाजारपेठेमुळे उपलब्ध होऊ लागले आहेत. त्याच वेळी गुंतवणूकदारांसाठीदेखील सहनिर्मितीच्या करारांची आणि व्यापक व्यावसायिक संधींची दारे खुली झाली आहेत. इथे आवर्जून उल्लेख करायला हवी अशी गोष्ट म्हणजे या व्यासपीठाला या उद्योग क्षेत्राशी संबंधित विशिष्ट उपक्रम, सादरीकरणे पाहण्याची दालने, गुंतवणुकदारांबरोबरच्या बैठका – चर्चा आणि कलाकृतींच्या थेट प्रक्षेपण सत्रांसारख्या लाइव्ह स्क्रीनिंगसारख्या उपक्रमांशी जोडले गेले आहे, यामुळे या व्यासपीठाच्या माध्यमातून केवळ आभासी संवादाच्या पलीकडे जात खर्या अर्थाने उपयुक्त असलेले करार आणि व्यवहार प्रत्यक्षात साकारले जातील याचीच सुनिश्चिती झाली आहे.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलात वेव्हज शिखर परिषद होणार असून, त्यावेळी हा वेव्हज बाजारही साकारला जाणार आहे. यानिमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल बाजारपेठेवर नोंदणी केलेल्या काही निवडक प्रतिनिधींना या बाजारपेठेत आपल्या संकल्पना मांडण्याची, या उद्योग क्षेत्रातील विविध घटकांसोबत संपर्क प्रस्थापित करण्याची, आघाडीच्या भागधारकांसोबत प्रत्यक्ष करार आणि व्यवहार पूर्णत्वाला नेण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभिनव दृष्टिकोनामुळे वेव्हज बाजार केवळ एक व्यासपीठ म्हणून मर्यादित राहिलेले नाही, तर ते अधिक स्मार्ट, परस्परांशी अधिक जोडलेले आणि जागतिक पातळीवरील सर्वसमावेशक मनोरंजन क्षेत्राच्या दिशेने सुरू झालेली चळवळच ठरले आहे.
एक कलाकार म्हणून, आम्ही कायमच आव्हानात्मक, प्रेरणादायी आणि चौकटीपलीकडे जाऊन विचार करायला लावणार्या अवकाशाच्या शोधात असतो. वेव्हज हा अशाच प्रकारच्या अवकाशाच्या निर्मितीचा प्रयत्न आहे. दूरदृष्टीने सुरू केलेल्या या वाटचालीचा आपणही एक भाग असल्याचा मला खरोखरच अभिमान वाटतो. ही परिषद आपल्या परस्परांशी संपर्काच्या, कलाकृतींच्या निर्मितीच्या आणि मांडणीच्या पद्धतींमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणेल. हा बदल केवळ भारतापुरता मर्यादित नसेल तर त्याचा प्रभाव अवघ्या जगात दिसेल. ही परिषद म्हणजे भारतासाठीचा ‘लगान’ क्षण आहे. जगभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एकतेचा, धैर्याचा आणि एका अशा दृष्टिकोनाचा क्षण आहे, ज्याचा प्रतिध्वनी आपल्या सीमांच्याही पलीकडे ऐकू येत राहील.