Friday, May 2, 2025
Homeब्रेकिंग न्यूजWAVES SUMMIT 2025 : ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी –...

WAVES SUMMIT 2025 : ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक उंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वेव्हज् २०२५’ परिषदेमध्ये आठ हजार कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३ हजार कोटी रुपयांचा तसेच गोदरेज सोबत दोन हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे.

जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी आणि कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, प्राईम फोकस आणि गोदरेज यांच्यासोबतच्या करारांमुळे आपले उद्दिष्ट पूर्ण होईल. विश्वास, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या निवडक कंपन्यांमध्ये ‘गोदरेज’चे नाव अग्रगण्य आहे. गोदरेजकडून उभारला जाणारा स्टुडिओ सर्वोत्तम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. करार झालेल्या सर्व संस्थांना राज्य सरकारच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले.

एनएसई इंडायसेसकडून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’ चा शुभारंभ
‘एनएसई इंडायसेस लिमिटेड’ने या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’चा शुभारंभ केला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया तसेच युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांच्याशी ‘सिडको’चा करार
सिडकोमार्फत नवी मुंबई येथे एज्युसिटी प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांचे कॅंपस स्थापन करण्याच्या उद्देशाने दोन्ही संस्थांशी स्वतंत्रपणे प्रत्येकी १ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

‘प्राईम फोकस’ आणि ‘गोदरेज’ यांच्यासोबत करार
उद्योग विभाग आणि ‘प्राईम फोकस’ तसेच ‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांशी स्वतंत्रपणे सामंजस्य करार करण्यात आले. ‘प्राईम फोकस’ सोबत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार करण्याच्या दृष्टीने करार करण्यात आला असून यामध्ये प्रस्तावित गुंतवणूक ३ हजार कोटी रुपये असणार आहे. या माध्यमातून सुमारे २ हजार ५०० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होईल. हा प्रकल्प २०२५-२६ मध्ये सुरू होईल.

तर ‘गोदरेज’ सोबत पनवेल येथे एए स्टुडिओ स्थापन करण्याबाबत करार झाला. या कराराचा पहिला टप्पा ५०० कोटी रुपये गुंतवणुकीचा असून याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ६०० रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प २०२७ मध्ये सुरू होईल. पुढील टप्प्यात १ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यामध्ये १ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. हा टप्पा २०३० पर्यंत सुरू होईल. या माध्यमातून एकूण २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर २ हजार ५०० रोजगार निर्मिती होईल.

मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी : फडणवीस
दरम्यान, जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. वेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले. राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

धुळे तापले; पारा 44 अंशांवर

0
धुळे | प्रतिनिधी शहरात उष्णतेने कहर केला असून शुक्रवारी (2 मे) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या...