Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूज‘आम्ही संस्कृती रक्षणासाठी नाचतो, तुम्ही कुठे नाचतात हे सांगू का?’

‘आम्ही संस्कृती रक्षणासाठी नाचतो, तुम्ही कुठे नाचतात हे सांगू का?’

ना. झिरवाळांचा विरोधकांवर पलटवार; तरुणांची घड्याळाला पसंती

जानोरी । प्रतिनिधी Janori

आपल्यावर विरोधकांनी कीर्तनात नाचतो, लग्नात नाचतो, वरातीत नाचतो, सोंगाडे नाचतो, अशी टीका केली आहे. होय, आपण खरोखर संस्कृती रक्षणासाठी नाचतो. गरिबांच्या लग्नातही नाचतो. पण तुम्ही कुठे नाचता, हे आम्ही सांगू का? आम्ही सांगायला गेल्यास विरोधकांना पळता भुई थोडी होईल, असा रामबाण टोला महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांनी विरोधकांना लावला असून गर्भीत इशारा दिला आहे. ना. नरहरी झिरवाळ यांनी मलिदा गँगच्या टीकेचाही खरपूस समाचार घेतला.

- Advertisement -

मोहाडी येथील महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचार दौर्‍याप्रसंगी ना. झिरवाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येेष्ठ नेते प्रकाश शिंदे होते. महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या मोहाडी गटात प्रचार दौर्‍यास उडंद प्रतिसाद मिळाला. मोहाडी गटातील जऊळके दिंडोरी, जानोरी, मोहाडी, गणेशगाव, आंबेदिंडोरी, शिवनई, वरवंडी, ढकांबे, मानोरी, तळेगाव दिंडोरी, अक्राळे या गावांमध्ये ना. नरहरी झिरवाळ यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ना. नरहरी झिरवाळ म्हणाले की, निवडणूक लागेपर्यंत विकासकामांचा मलिदा घेणार्‍यांना कदाचित वाटा कमी-जास्त झाला असेल तेच आता आरोप करतात. मीही कुणाला किती विकासकामे दिले, तुम्हाला काय आरोप करायचे, काय बदनामी करायची, काय जनतेत गैरसमज पसरवयाचा ते करून घ्या. लवकरच मी जनतेसमोर आपला पर्दाफाश करणार आहे.

विकासावर चर्चा करावी. 20 वर्षे आम्ही गोड वाटलो. अचानक कसे कडू झालो? मी तर तीन वेळेस घड्याळ या निशाणीवरच आमदार म्हणून निवडून आलो आणि पाचव्यांदाही घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवत आहे. तर तुम्ही मला गद्दार कसे म्हणतात? याचे उत्तर द्यावे. ना. झिरवाळ यांनी सांगितले की, एक ठेकेदार आरोप करतो की, आपण काही ठिकाणी बुद्धविहार मंजूर केले. ही बुद्धविहारे झिरवाळ यांच्या प्रयत्नातून झाल्याचे पण सांगतो. पण तो ठेकेदार अनेक गावांचे नावे सांगू शकत नाही. ज्या ठिकाणी अजूनही बुद्धविहार, सामाजिक सभागृहे यांची आवश्यकता आहे. कारण त्याला आंबेडकरी वस्त्यांचा अभ्यास लागतो. माझ्या आईचे पिंडदान गांगुर्डे कुटुंबाने केले होते. त्यामुळे मी जातीवाद करत नाही. ठेकेदार त्याच्या पद्धतीने निवडणुका आल्याने आरोप-प्रत्यारोप करतो. त्यानी काही फरक पडत नाही.

दिंडोरी येथे 12 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र तयार होत आहे. या ध्यान केंद्रामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याचा गौरव वाढणार आहे. त्याला अजूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच ओझरखेड, वरखेडा, बोपेगाव इत्यादी गावांतील ग्रामपंचायत इमारतींना प्रचंड निधी मिळवून दिला असल्याचे ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे, योगेश तिडके, लक्ष्मण देशमुख, विश्वासराव देशमुख, प्रकाश वाघ, पंढरीनाथ पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून ना. झिरवाळांनाच विजयी करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे यांनी सांगितले की, दिंडोरी-पेठ तालुक्यातील आंबेडकरी जनता ना. नरहरी झिरवाळ यांच्या सोबतच असून प्रचंड मताधिक्क्याने ना. झिरवाळांना निवडून देऊ, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जानोरी, मोहाडी, जऊळके दिंडोरी इत्यादी परिसर घड्याळमय झाले होते. जानोरी, मोहाडी, अक्राळे, शिवनई, वरवंडी, आंबेदिंडोरी, ढकांबे इत्यादी परिसरात ना. नरहरी झिरवाळ यांचे महिलांनी औक्षण केले. ना. झिरवाळ यांनी मंत्रालयात उडी मारल्याने जनरल कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळाल्याने अनेक बहुजन समाजातील युवकांनी ना. झिरवाळांचे व्यासपीठावर आभार मानून सत्कार केला. तसेच गावोगावी प्रचार करून घड्याळाला प्रचंड मतदान करून ना. झिरवाळ यांना प्रचंड मताधिक्क्यानी विजयी करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जानोरीचा एकमुखी घड्याळाला पाठिंंबा
जानोरी । मोहाडी गटातील जानोरी या गावात माजी सरपंच शंकरराव वाघ यांनी सांगितले की, ना. नरहरी झिरवाळ यांच्याबरोबर गावातील जनता आहेच; परंतु जानोरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ना. नरहरी झिरवाळ यांच्या बरोबर असून ना. नरहरी झिरवाळ यांना 23 नोव्हेंबर निकाल पेटीतून दाखवून देऊ. जानोरी गावातून सर्वात जास्त मतदानाचा आकडा समोर येईल. तसेच जानोरी गावात ना. नरहरी झिरवाळ यांनी अनेक मंदिरांना सभामंडप तसेच जगदंबा माता मंदिराला निधी दिला आहे. तसेच वाडीवस्त्यांवर सिमेंट काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक तसेच कानिफनाथ मंदिराला सभामंडप अशा अनेक विकासकामांना ना. झिरवाळ यांच्या माध्यमातून निधी मिळाल्याने जानोरी गाव हे पूर्णत: ना. नरहरी झिरवाळ यांच्या सोबतच असून जास्तीत जास्त मतदान घड्याळाला देऊ, असे शंकरराव वाघ यांनी सांगताच उपस्थितांनी ‘झिरवाळ साहेब तुम आगे बेढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या.

घड्याळाला मताधिक्क्य देण्यावरून मोहाडी-खेडगाव गटात पैज
दिंडोरी-पेठ तालुक्यात घड्याळाचा सर्वत्र जोर पाहता ना. नरहरी झिरवाळ यांचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे कोणत्या गटात कोण जास्त मतदान देतो यावरून कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अशीच एक साधीसुधी पैज मोहाडी गटाचे नेते योगेश तिडके व खेडगाव गटाचे नेते वसंत कावळे यांच्यात लागली आहे. दोघांनीही आपापल्या गटात घड्याळाला मताधिक्क्य देण्याचे सभेतून जाहीर केले.

‘कट्टपा ने बाहुबली को क्यू मारा?’
जानोरी । मागील वर्षी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांच्या उरावर बसून निवडणूक विरोधात लढवली आणि आता तेच विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करत आहेत. जर तुम्हाला एकत्र यायचे होते तर तुम्ही लढाईत गुंतले. मग ‘कट्टपा ने बाहुबली को क्यू मारा’ असा मार्मिक टोला बोेपेगावचे सरपंच वसंतराव कावळे यांनी लगावला. वसंतराव कावळे म्हणाले की, 20 वर्षांपूर्वी सामान्य माणसाला तुम्हीच आमदार केले आणि त्या आमदाराने अतिशय उत्तम काम करून विधानभवनात पहिल्या रांगेत बसण्याचे स्थान मिळवले. त्याच आमदाराला आता तुम्ही विरोधक म्हणून व खोटे आरोप करून डावलण्याचे काम सुरू केले आहे. तरी जनतेने खोट्या भूलथापांना बळी न पडता ना. नरहरी झिरवाळ यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्यावे, असे आवाहन कावळे यांनी केले.

कादवा कारखान्याला झिरवाळांची मदत
मोहाडी । कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी सांगितले की, कादवा कारखान्याला ना. नरहरी झिरवाळ यांनी खूप मदत केली आहे. कादवाच्या विकासात ना. नरहरी झिरवाळ यांचा खूप मोठा वाटा आहे. परिसरात दळणवळणाच्या सुविधा सुधारल्या. सिंचनाचा प्रश्न सुटला. इथेनॉल प्रकल्पास मंजुरी मिळण्यास अडचणी येत होत्या. परंतु ना. झिरवाळ यांनी कादवा ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन आपल्या खुबीने प्रकल्पाला मंजुरी मिळवून दिली. आम्हाला एक वर्ष प्रयत्न करूनही याला यश आले नव्हते. कादवा कारखान्याला लागणारा दोन ते तीन कोटी रुपयांचा खर्च वाचवला. पुढील काळात कादवा कारखाना येथे होणार्‍या इथेनॉल पानेवाडी प्रकल्पात पाठवले जाणार आहे. त्याचा फायदा कादवा कारखाना व सभासदांना होणार आहे. त्यामुळे कादवा कारखाना परिसराचे सर्व मतदान घड्याळाला देऊन ना. नरहरी झिरवाळ यांना निवडून आणू. ना. नरहरी झिरवाळ हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यांच्या स्वभावामुळे ते निवडून येणार असल्याचे कादवा कारखाना संचालक शहाजी सोमवंशी यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या