Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAkshay Shinde : 'आम्ही आमची भूमिका कागदोपत्री मांडणार'; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी...

Akshay Shinde : ‘आम्ही आमची भूमिका कागदोपत्री मांडणार’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

पुणे | Pune
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी. या प्रकरणातील पोलिसांचे निलंबन व्हावे अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे.

अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. पोलिसांकडून तपास संथ गतीने सुरू होता, असा आरोप त्यांनी केला. ‘ पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? ज्या पिस्तूलाने अक्षयने गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेले पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकतो?’ याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

- Advertisement -

पुढे त्या असे ही म्हणाल्या, मुलींना न्याय मिळाला पाहिजे पण बदलापूर आरोपी एन्काउंटर प्रकरणी तुम्ही शाळा प्रशासनाला सोडून दिले त्याचे काय?, मी आई आहे, विरोधक म्हणून बोलत नाही. शिक्षिका म्हणून आणि कायद्याची विद्यार्थिनी म्हणून बोलतेय. या सगळ्या प्रकरणात जिथे सीसीटीव्ही नव्हते ती शाळा तुम्ही का वाचवताय? शाळा वाचवणे तुम्हाला कितपत योग्य वाटतेय? एन्काउंटर केलेल्या पोलिसांचे निलंबन व्हायला हवे. जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते मात्र जेव्हा पोलीस गोळी झाडतात तेव्हा ती थेट डोक्यात लागते हे आकलनाच्या पलीकडे आहे. या प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाला राज्य सरकारच्या प्रभावापासून लांब ठेवले जावे असे त्यांनी मागणी केली.

ठाण्यातून जे सत्ताकेंद्र चालते त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या स्पष्ट ठेवल्या आहेत. जर अशाप्रकारे एन्काउंटर झाले तर २४ तासांच्या आत याची सगळी माहिती मानवाधिकार कमिटीला गेली पाहिजे. ही माहिती त्यांना मिळाली आहे का? यावरही चर्चा व्हायला हवी. या सगळ्या प्रकरणी अद्याप आपटेची अटक का नाही, शाळा प्रशासनाचे काय करणार आहात यावर आम्ही रितसर कोर्टात प्रश्न विचारणार आहोत. कोर्टात आम्ही आमची भूमिका कागदोपत्री मांडणार आहोत असे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

बलात्काराचा आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहेत, मात्र विरोधकांना यात काळबेरं दिसतेय. त्याच मुद्यावरूनही सुषमा अंधारे यांनी या भाष्य केलेय. काही लोकं मला विचारत आहेत की तो तर गेला, तुम्ही का त्यावर आक्षेप घेताय ? असे सांगताना त्यांनी संजय शिरसाट यांच्या विधानाचा दाखला दिला. एकनाथ शिंदे यांच्या(शिवसेना) पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केल्याचे अंधारे यांनी नमूद केले . ‘पोलिसांना त्यांचे काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणे हे संशयास्पद वाटते. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे’ अशी मागणीही शिरसाट यांनी केली. त्यामुळे याप्रकरणी फक्त आम्ही, एखाद्या व्यक्तीनेच संशय व्यक्त केलेल नाही, असे अंधारे यांनी नमूद केले.

संजय शिंदेंची वादग्रस्त कारकिर्द

या एन्काउंटर प्रकरणातील पोलिस अधिकारी संजय शिंदे यांची आजअखेर वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे. विजय पलांडे याला पळवून लावण्यात संजय शिंदे यांचा हाथ होता. त्यामुळे संजय शिंदे यांना काही कालावधी करिता निलंबित देखील करण्यात आले होते. त्यामुळे अक्षय शिंदे याला संपवल्यामुळे हे प्रकरण संपत नसून कोणाला वाचवले गेले आहे ? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि या फेक एन्काउंटर प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत, ३००२ किंवा ३०१४ मधील तारीख दिली तरी आम्ही न्याय मागत राहणार आहोत, ही संपूर्ण घटना राज्य प्रायोजित दहशतवाद आहे का? असा सवाल उपस्थित करीत महायुती सरकारवर त्यांनी टीका केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या