नाशिक | प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले आहे. पण काही तालुक्यांमध्ये अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक गावांमध्ये पाऊस नसल्याने अर्ध्यावर आलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच आता हवामान खात्याने पावसाबद्दल अपडेट दिले आहे.शनिवार दि. १६ ऑगस्ट ते बुधवार दि. २० ऑगस्ट पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ‘या’ जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशाराविशेषतः मुंबईसह ठाणे पालघर रायगड कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड जिल्ह्यात व नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा कोल्हापूर, जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड, तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात ह्या पाच दिवसात अधिक जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीत ह्या आठवड्यात अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.पावसाची शक्यता कश्यामुळे? i) हवेच्या कमी दाब क्षेत्राचा मान्सूनचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकल्या मुळे.ii) बंगालच्या उपसागरात दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान ७.६ किमी. उंचीपर्यंतचे अस्तित्वात असलेले गोलाकार हवेचे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची वायव्येकडे मार्गक्रमणाच्या शक्यतेमुळे.iii)अरबी समुद्रात ३.१ किमी. उंचीवरील चक्रीय वाऱ्याची स्थिती-ह्यामुळे ह्या पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.iv) ‘एमजेओ'(मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन) ची वि.वृत्तीय मार्गक्रमणातील वारी सध्या भारतदेश समुद्रीय क्षेत्रातून १४ ते २० ऑगस्ट दरम्यान मार्गस्थ होत आहे. त्याची बळकटी दाखवणारा ‘आम्प्लिटुड’ हा एक च्या आसपास आहे. ‘एमजेओ’ च्या ह्या वारीचे जेंव्हा १४ ऑगस्ट ला अरबी समुद्रातून प्रयाण झाले, तेंव्हा मरगळलेला मान्सून सक्रिय झाला. तो सह्याद्रीचा घाट चढला. आणि घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १४ ऑगस्टपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे. एमजेओ ची ही वारी बंगालच्या उपसागरात १७-१८ ऑगस्ट दरम्यान प्रवेशण्याची शक्यता असुन मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेलाही त्यामुळे अधिक बळ मिळू शकणार असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.




