नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात सूर्य आग ओकू लागला असून, वाढत्या तापमानाने (Temperature) अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी ४२ ते ४३ अंशांवर (Degrees) तापमानाचा पारा गेला आहे. यात काल नाशिकचा (Nashik) पारा ४०.२ अंशांवर पोहोचला होता. त्यानंतर आज हाच पारा ४१. अंशांपर्यंत पोहोचला आहे.
हवामान विभागानें (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (सोमवारी ) अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.२ अंश तर चंद्रपूरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर नाशिकचा पाराही ४०.२ अंशांवर पोहोचला होता. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागरातच सक्रिय आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा इशारा आहे. तसेच आता अवकाळीचे वादळ महाराष्ट्राकडून (Maharashtra) पुन्हा दक्षिणेकडे गेले आहे. तर उत्तरेकडे नव्याने पश्चिमी चक्रीवादळ तयार होत आहे.
त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार पावसासह (Rain) गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तरेकडे अवकाळी पाऊस आणि महाराष्ट्रात उष्णतेचा कडेलोट होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी चाळीशीच्या वर तापमान जात असताना वाढत्या उष्णतेपासून (Heat) नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून केले जात आहे.
कुठल्या जिल्ह्यात काल किती तापमान होते?
अकोला ४४.२, अमरावती ४२.६, यवतमाळ ४२.४, वर्धा ४१.१, नागपूर ४२.२, चंद्रपूर ४३.६, गोंदिया ४०.४ गडचिरोली ४०.६, जळगाव ४२.८, नंदुरबार ४२.८, परभणी ४०.७, छत्रपती संभाजी नगर ४०.२, लातूर धाराशिव ३९.२, पुणे ३९.२ सोलापूर ४१.४, नाशिक ४०.२