Sunday, November 24, 2024
Homeक्राईमलग्न समारंभात चोरी करणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात

लग्न समारंभात चोरी करणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी येथील सिल्व्हर ओक लॉन्समध्ये रिसेप्शन कार्यक्रमादरम्यान 8 लाख 50 हजार रुपयांची पर्सची चोरी झाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीची रक्कम हस्तगत केली आहे. दि. 03 जुलै 2024 रोजी फिर्यादी किसनलाल बाबुलाल कोठारी, रा. बोलठाण, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक यांचे सिल्व्हर ओक लॉन्स, शिर्डी, ता. राहाता येथील रिसेप्शन कार्यक्रमादरम्यान किसनलाल यांची पुतणी हातातील पर्स बाजुला ठेवून फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेल्या त्यावेळी एक अनोळखी मुलाने फिर्यादीची 8 लाख 50 हजार रुपये रक्कम असलेली बॅग चोरून नेल्याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता क. 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

सदर घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थनिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन, गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि. हेमंत थोरात व अंमलदार संदीप पवार, रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, फुरकान शेख, सागर ससाणे, अमृत आढाव व अरुण मोरे अशांचे पथक नेमून वर नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आवश्यक सूचना देवून पथक रवाना केले.

या पथकाने सिल्व्हर ओक लॉन्स येथील आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. तसेच रिसेप्शनवेळी कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग व फोटोग्राफर यांचेकडील व्हिडीओ शुटींग व फोटो तपासले असता एक गोर्‍या रंगाचा मुलगा बॅग उचलून घेऊन जाताना दिसून आला. पथकाने सदरचे फुटेज सोशल मीडिया व्दारे गुप्तबातमीदारांना पाठविले होते. पथक संशयित मुलाचा शोध घेत असताना पथकास शिर्डी येथील लग्न समारंभामध्ये चोरी करणारा गोर्‍या रंगाचा व अंगामध्ये राखाडी रंगाचा नक्षीकाम असलेला शर्ट घातलेला मुलगा पाठीवर बॅग घेवून पत्रकार चौकाकडून तारकपूर बस स्थानकाकाडे पायी जात असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तारकपूर रस्त्याने जावून पहाणी केली असता एक 14 ते 15 वर्षे वयाचा गोर्‍या रंगाचा पाठीवर बॅग घेतलेला व रस्त्याने पायी चाललेला मुलगा दिसला.

त्यास थांबवून त्याचेकडे चौकशी करता तो अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. सदर अल्पवयीन मुलाची पंचा समक्ष झडती घेता त्याचे झडतीमध्ये रोख रक्कम मिळून आली. सदर रोख रकमेबाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने मागील 10 ते 12 दिवसांपूर्वी शिर्डी येथील लग्नातून चोरी केलेल्या बॅगेतील रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने सदर विधिसंघर्षीत बालकास 45 हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेवून शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या