Saturday, May 4, 2024
Homeजळगावसप्ताह घडामोडी : रात्रीच्या गस्तीला चोरट्यांची सलामी

सप्ताह घडामोडी : रात्रीच्या गस्तीला चोरट्यांची सलामी

शहर खून, घरफोडीच्या घटनांनी हादरुन गेले आहे. या घटनांवर नियंत्रणासाठी पोलिसांना रात्रीची गस्त वाढवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या कडक सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. मात्र रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून जळगाव तालुक्यातील भादलीत सात तर दुसर्‍या दिवशी शिरसोलीत सहा ठिकाणी घरफोडी करीत लाखोंचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे रात्रीची गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला चोरटे घरफोडी करुन सलामी देत आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आठवडे बाजारात सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून झालेल्या खूनाच्या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची बैठक घेतली. या बैठकीत वाढत्या खूनाच्या घटनांबरोबर सराईत गुन्हेगार व अवैधधंद्यांवर अंकुश ठेवण्याच्या कडक सूचना पोलीस अधीक्षकांनी कर्मचार्‍यांना दिल्या होत्या.

- Advertisement -

त्याचबरोबर शहरातील अस्थापनांसह खाद्यपदार्थाच्या हातगाड्या व हॉटेल्स देखील बंद करण्याचे आदेश देत रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्यानुसार रात्री दहा वाजेनंतर शहरातील आस्थापना बंद होत आहेत. मात्र चोरटे दिवसा बंद घरांची रेकी करीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका नव्हे तर तब्बल सहा ते सात घरात एकाचवेळी चोरी करुन लाखोंचा मुद्देमाल लंपास करीत आहेत.

तसेच दररोज रात्री एका अधिकार्‍यासह बीट मार्शल व संबंधित अंमलदाराने गस्त मारणे आवश्यक असते. बहुतांश अधिकारी हे गस्तीवर नियुक्ती असतांना ते गस्तीच्या नावाखाली घरीच असतात. यावेळी गस्तीवर असलेले कर्मचारी शासकीय वाहनातून मुख्य रोडवर जावून सायरन वाजवून निघून जातात.

याचवेळात चोरटे घरफोडी करुन निघून जातात. दररोज होणार्‍या घरफोडीच्या घटनां मुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या पोलिसांच्या गस्तीवर देखील आता वरिष्ठांकडून विचारणा करुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त प्रामाणिकपणे करावी हीच जळगावकरांची माफक अपेक्षा.

- Advertisment -

ताज्या बातम्या