Monday, November 4, 2024
Homeशब्दगंधलढवय्या मित्र हरपला

लढवय्या मित्र हरपला

– सुबोध भावे, सुप्रसिध्द अभिनेते

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणार्‍या नितीन देसाईंचे निधन अत्यंत वेदनादायी आहे. नितीन हा ‘प्रभात’च्या काळानंतर स्वतःचा स्टुडिओ असणारा मराठीतील एकमेव निर्माता होता. कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती त्याच्यामुळे पडद्यावर सुंदर दिसल्या. इतके सुंदर चित्र घडवणारा आमचा मित्र स्वतःच्या आयुष्याचे चित्र असे बेरंग का करून गेला, हा प्रश्न मनाला सतावणार आहे. आजवर आलेल्या अनेक संकटांचा हिरीरीने आणि धैर्याने सामना करत त्यावर मात करत तो त्यातून बाहेर पडला होता.

- Advertisement -

छोट्या-मोठ्या संकटांनी डगमगणारा नितीन कधीच नव्हता. उलट काम कसे करायचे, मोठी स्वप्ने पाहून त्यांच्या मागे लागून ती पूर्णत्वाला कशी न्यायची हे आम्ही नितीनकडे पाहून शिकलो. कितीतरी उत्तमोत्तम कलाकृती त्याच्यामुळे पडद्यावर सुंदर दिसल्या. मुळात नितीनचा स्वभाव हा स्वतःच्या अडीअडचणींविषयी बोलणारा नव्हता. तो नेहमी कलेच्या गोष्टी बोलायचा, नवीन स्वप्ने दाखवायचा. स्वतःच्या आयुष्यातील समस्या त्याने कधी कुणाला सांगितल्या असतील असे मला वाटत नाही. आमचे नियमित बोलणे व्हायचे. गेल्या महिन्यामध्ये मी त्याच्या एन.डी. स्टुडिओमध्ये गेलो होतो तेव्हा त्याने मला आणि आमच्या टीमला स्वतः सगळा स्टुडिओ दाखवला होता.

अगदी काही दिवसांपूर्वी ‘बालगंधर्व’च्या पॉडकास्टच्या निमित्ताने आम्ही एकत्र भेटणार होतो, पण बाकीची मंडळी नसल्यामुळे ती भेट रद्द झाली. नितीनच्या महाराणा प्रताप यांच्यावरील वेबसिरीजमध्येही मी काम करणार होतो. त्यामुळे नितीन हा सदोदित कामात मग्न असणारा होता. अलीकडील काळातील भेटीत त्याच्या चेहर्‍यावर थकवा, तणाव दिसून यायचा, पण वयोमानानुसार किंवा खूप काम केल्यामुळे किंवा पुरेशी झोप न घेतल्यामुळे तो असावा असे वाटायचे. त्यामागे इतके काही तरी घडत असेल आणि त्यामुळे त्याला इतके टोकाचे पाऊल उचलावे लागेल असे कधीच वाटले नाही. आर्थिक समस्या असल्या तरी त्याच्या कार्यक्षमतेवर, जिद्दीवर, धडाडीवर आमचा विश्वास होता. हा माणूस कसल्याही संकटावर मात करून बाहेर पडेल याची खात्री वाटायची.

‘बालगंधर्व’ हा चित्रपट नितीन देसाई नसता तर होऊच शकला नसता. प्रेक्षकांसाठी काहीतरी करून दाखवण्याबाबतचा जो टोकाचा वेडेपणा किंवा ज्याला मॅडनेस बालगंधर्वांमध्ये होता तोच नितीनमध्ये होता. त्यामुळे ‘बालगंधर्व’ करण्याचे ठरल्यानंतर अवघ्या चार महिन्यांमध्ये त्याने सेट उभा केला इतक्या वेगाने आणि मेहनतीने त्याने काम केले. त्यातील छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता केली. बालगंधर्वांनी जे भव्यदिव्य नाटक करण्याचे स्वप्न पाहिले, तशाच प्रकारे ‘बालगंधर्व’ चित्रपट करण्याचे स्वप्न नितीनने पाहिले. नितीन देसाईशिवाय हा चित्रपट दुसरे कुणीही करू शकले नसते. इतका धाडसी निर्णय घेणारा आणि तो तितक्याच क्षमतेने पूर्णत्वाला नेणारा नितीनच एकमेव होता.

मेहनतीच्या बाबतीत तो आमच्यापेक्षा नेहमीच पुढे असायचा. त्याकाळातील अनुभवातून शिस्तीचे, मेहनतीचे महत्त्व नितीनमुळे नव्याने मला कळले. मोठी स्वप्ने पाहण्याचे पॅशन नितीनमुळे अनेकांना मिळाले. प्रचंड मेहनती असल्यामुळे त्याच्याविषयी, त्याच्या कामाविषयी आम्हाला आदर होता. एका छोट्याशा घरातील मुलाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर, कर्तृत्वावर घेतलेली इतकी मोठी झेप पाहून अभिमान वाटायचा. हा आदर आणि प्रेम आयुष्यभर कायम राहील. पण त्याने इतकी टोकाची भूमिका का घेतली, हा प्रश्न आयुष्यभर छळत राहील. कला क्षेत्रातील त्याची जागा कुणीही भरून काढू शकणार नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या