नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने एन्ट्री केली आहे. अमेरिकेने रविवारी इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांना अमेरिकेने लक्ष केले. अमेरिकेने बी-२ स्टिल्थ बॉम्बर विमानांनी इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यात बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे इराणच्या भूमिगत अणुस्थळांनाही नष्ट केल्याचा दावा केला जात आहे. बी-२ स्टिल्थ बॉम्बरने हा हल्ला करण्यात आला. या बी-२ स्टिल्थ बॉम्बरबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. बी-२ बॉम्बर म्हणजे नेमके काय आणि ते इतके खास का आहे ते जाणून घेऊया….
गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका इराण-इस्रायलच्या संघर्षात सामील होईल की नाही यावर चर्चा सुरू होत्या. रविवारीमध्य रात्री उशिरा ही भीती खरी ठरली आणि अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियात तणाव वाढू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर हल्ला करण्यासाठी बी-२ स्टिल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आला. ट्रम्प म्हणाले की, फोर्डोवर हल्ला करण्यासाठी सहा बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला, ज्यामुळे फोर्डोमधील इराणचे भूमीगत अणुस्थळ उध्दवस्थ झाले. त्याच वेळी, नतान्झ आणि इस्फहानवर हल्ला करण्यासाठी ३० टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला.
काय आहे बी-२ स्टिल्थ बॉम्बर?
बी-२ स्टिल्थ बॉम्बर हे अमेरिकन हवाई दलातील एक अद्वितीय शस्त्र आहे, जे तीन दशकांपासून अमेरिकन स्टिल्थ तंत्रज्ञानाचा कणा आहे. १९८९ मध्ये पहिल्या उड्डाणापासून, हे विमान जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या विमानांपैकी एक आहे. बी-२ स्टिल्थ बॉम्बरमध्ये शत्रूचे हवाई संरक्षण भेदण्याची क्षमता आहे. हे नॉर्थ्रोप ग्रुमन नावाच्या कंपनीने बनवले आहे.
बी-२ स्टिल्थ बॉम्बर विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजा सहजी ट्रॅक करता येत नाही. तसेच, ते उंचीवर उडू शकते, ज्यामुळे हवाई संरक्षण प्रणालीला भेदणे खूप कठीण होते. बी-२ स्टिल्थ बॉम्बर शत्रूच्या लक्ष्यांवर पूर्ण अचूकतेने हल्ला करू शकतो. हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने डिझाइन केले आहे, ज्यामुळे पारंपारिक रडार प्रणाली ते शोधू शकत नाहीत.
बी-२ स्टिल्थच्या विशेष रचनेमुळे, अनोख्या पंखांच्या डिझाइनमुळे आणि अत्यंत कमी इन्फ्रारेडमुळे, ते फक्त ०.००१ चौरस मीटरचा रडार क्रॉस सेक्शन तयार करते, जे एका लहान पक्ष्याइतके आहे. हेच कारण आहे की जेव्हा ते शत्रूच्या हद्दीत प्रवेश करून त्याच्या तळांवर पूर्ण अचूकतेने हल्ला करण्याचा विचार करते तेव्हा बी-२ स्टिल्थ बॉम्बरची तुलना करता येत नाही. ते एकाच वेळी ६ हजार नॉटिकल मैल अंतर कापू शकते. ते जड शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.
इराणवर बी-२ स्टिल्थचा वापर का करण्यात आला?
इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला होता, परंतु इराणची अणुस्थळे भूमिगत आहेत, त्यामुळे इस्रायलने केलेल्या हल्ल्यात त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. इस्रायलकडे भूमिगत संरचना नष्ट करू शकणारी शस्त्रे नाहीत. अशा परिस्थितीत, अमेरिकेने त्यांच्या सर्वात खास शस्त्रांपैकी एक असलेल्या बी-२ स्टिल्थ बॉम्बरमधून ३०,००० पौंड वजनाचे मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर किंवा बंकर बस्टर बॉम्ब वापरले, ज्यामध्ये जमिनीखालीही मोठ्या प्रमाणात विनाश करण्याची शक्ती आहे. फोर्डो येथील भूमिगत अणु संरचना नष्ट करण्यासाठी बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला.
काय आहे बंकर बस्टर?
बंकर बस्टर हे अत्यंत शक्तिशाली स्फोटकं आहेत जी जमिनीत खोलवर जाऊ शकतात. त्यांचा वापर सामान्यतः बंकर नष्ट करण्यासाठी केला जातो. हे जीपीएस गाईडेड बॉम्ब अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी वापरले जातात.





