संगमनेर |महेश पगारे | Sangamner
राज्याच्या राजकारणात नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली होती. त्याची कारणेही तशीच आहेत. या मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडून येत नवा इतिहास रचला. त्यानंतर सातत्याने ते चर्चेत राहत आहेत. त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या काँग्रेस पक्ष राहिलेला आहे. अशा पक्षाच्या वाटचालीवर आणि नेतृत्वावर त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे तोंडभरुन कौतुक करताना राज्यातील कोणत्याही काँग्रेस नेत्याने, खुद्द प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा खासदार राहुल गांधींना एका तासात भेटून दाखवावं, असं आव्हानच त्यांनी दिल्याने राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
काँग्रेस पक्षातून राजकारणाची सुरुवात झालेले आमदार सत्यजीत तांबे यांनी मुलाखतीत विविध मुद्यांवर रोखठोक भाष्य केलं आहे. विशेषतः काँग्रेसवर केलेली टीका केंद्रस्थानी राहिली आहे. काँग्रेसच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, मला चिंता वाटते ही चिंता प्रेमामुळे सुद्धा वाटते. माझे त्या पक्षावर प्रेम आहे. कारण त्या विचारांतूनच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. मात्र, जेव्हा आम्ही पाहतो की तेथे काहीच होत नाही. कोणीच सिरीयस नाहीये. देशाच्या विरोधात भूमिका घेण्याचे काम सुरू आहे. देश एका बाजूला चालला आहे. तुम्ही काहीतरी वेगळंच करताय. हे कुठंतरी मनाला खटकतं. राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण नेमकं काय? असा परखड सवाल त्यांनी मुलाखतीत उपस्थित केला.
पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाची भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले. त्यात काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचाही समावेश आहे. त्यांना अमेरिकेत बाजू मांडण्यासाठी पाठवण्यात आले, त्यावर काँग्रेसने लगेच पंतप्रधानांना पत्र लिहिलं की, काँग्रेसमधून कोण पाठवायचं हे तुम्ही ठरवणार का? आम्ही आमचे नाव देणार. हे त्यांचेच नाव देणार जे त्यांचे आजूबाजूचे लोक आहेत. हे त्यांचेच नाव देणार जे त्यांचे लांगुनचालन करतात. ते शशी थरुर यांना संधी देणार नाहीत. चांगले लोक आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांचा दिल्लीतील काँग्रेसची चांडाळचौकडी द्वेष करते, त्यांचा तिरस्कार करते अशा तिखट शब्दांत रोष व्यक्त करताना काँग्रेसचा विचार या देशातून कधीच संपू शकत नाही असे ठामपणे सांगत काँग्रेसची गरज आहे का तर शंभर टक्के आहे असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष म्हणून भविष्य चिंतीत वाटते, कारण यात इनकमिंग नाही. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेत काम केलं आहे. सध्या ही विद्यार्थी संघटना कुठे आहे? कुठे आंदोलन करताना दिसते का? असे प्रश्न उपस्थित केले.
संगमनेर विधानसभा निकालावर बोलताना आ. तांबे म्हणाले, आत्मविश्वास थोडा जास्त झाला. आमचा पराभव कधी होऊच शकत नाही, असा आम्हाला सगळ्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता. तसेच अनेक राजकीय कारणंही आहेत. संगमनेर शहरात चुकीच्या मार्गांनी प्रपोगंडा झाला. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावण्यात आलं. आम्ही मुस्लिमधार्जिणे आहोत, माजी मंत्री थोरात मुस्लिमधार्जिणे आहेत, अशाप्रकारची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यातच लाडकी बहीणसारखी योजना आली होती, त्याचा परिणाम झाला. पैशांचा अमाप वापर झाला. या सगळ्या गोष्टीतून संगमनेर विधानसभेचा निकाल लागल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना ते म्हणाले, त्यांच्यात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची झलक दिसते. एसएमएसवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची ओळख आहे. ते नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करतात तेव्हा चांगलं वाटतं. कोणत्याही नेत्याकडून कार्यकर्त्याला दोनच अपेक्षा असतात एकतर तो मोठ्या मनाचा हवा, दुसरं म्हणजे तो उपलब्ध होणारा हवा. तुम्हाला काही शंका, अडचणी आहेत तेव्हा तो उपलब्ध पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस याच्यांमध्ये हे दोन गुण आहेत. ते मोठ्या मनाचे आहेत, कधीही छोटा विचार करत नाही. कोणतेही काम ते लगेच करतात. त्याचा काय फायदा आहे, काय तोटा आहे याचा विचार ते करत नसल्याचे म्हणाले.
भाजप प्रवेशावर त्यांना विचारले असता, माझा प्रवेशाचा अजून काही विषय नाही. जे लोक मला मार्गदर्शन करतात ते सांगतील मला कधी काय करायंच ते. सध्या अपक्ष आहे आणि अपक्षचं चांगलं आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. एकूणच सध्या तरी त्यांच्या मनात नेमकं चाललं तरी काय याचा अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.