Tuesday, November 5, 2024
Homeशब्दगंधमनांना काय झालंय?

मनांना काय झालंय?

डॉ. राजेंद्र बर्वेज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार सर्वाधिक रुग्ण असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये चार मानसिक विकार आहेत. त्यात नैराश्य हे पहिल्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

उदासीनता आणि निराशेची छाया मनावर असेल तर जगावेच कशाला असे टोकाचे विचारही मनात येऊ शकतात. त्यामुळे नैराश्य वाढत जाते. औदासीन्य ही जाचक मनोवस्था आहे आणि ती कायम टिकणारी नाही. त्यातून बाहेर येणे शक्य असते. मन शांत राहण्यासाठी सर्व त्या गोष्टी आपण करत राहिले पाहिजे. आपण जे काम करत आहोत त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. तसेच ज्या गोष्टीने मनाला बरे वाटते आहे, मन शांत राहू शकते, मनाला उभारी येते, आत्मविश्वास वाटतो अशी एखादी गोष्ट नियमाने करत राहा. त्यासाठी वेळ काढा. स्वत:साठी वेळ काढणे आणि आयुष्याबाबत तटस्थपणे विचार करणे हे सर्वात महत्त्वाचे. रोजच्या रोज मनातील वाईट घटनांचा गाळ काढून टाकला तर ताणाचे व त्यातून येणार्‍या निराशेचेही परिणाम कमी होत जातात. मनात उदास वाटत असताना, विफलतेचे कढ येत असताना अगदी एकटे एकटे वाटत असताना उबदार प्रेमाच्या आधाराची गरज असते. त्या आधारामुळे नैराश्य मावळत नसले तरी औदासीन्याच्या वेदना हलक्या होतात. नैराश्याची लक्षणे सुसह्य होतात. यासाठी जादूचे किंवा परवलीचे अंतिम शब्द नाहीत, पण हळुवारपणे घडलेला स्पर्श, पाठीवरून फिरवलेला हात खूप आश्वासक वाटतो.

दु:खाच्या यातायातीत आपण एकटे नाही, हा विचार मनाला आधार देतो. त्यासाठी आधार देणार्‍या व्यक्तीमध्ये सहअनुकंपा म्हणजे एम्पथी असणे गरजेचे असते. आधार देणे म्हणजे सतत त्या व्यक्तीबरोबर असणे नव्हे. त्यांना त्यांचा अवकाश द्या. विशेषत: पुरुष रुग्णांना त्याची जास्त गरज भासते. नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये रोजच्या साधारण गोष्टीही उरकण्याची ऊर्जा नसते. अशावेळी ‘आंघोळ कर’, ‘कपडे बदल’ असे सारखे सुचवू नये. नैराश्यग्रस्त व्यक्ती संध्याकाळी अधिक अ‍ॅटिव्ह होतात. त्यावेळी त्यांना रोजच्या गोष्टी करू द्याव्या. साधारणपणे गप्पागोष्टी करणे, लोकांमध्ये मिसळणे यामुळे सामान्य व्यक्तींना हलके वाटते. त्यामुळे आपण ते नैराश्यग्रस्तांना पुन्हा पुन्हा सुचवत राहतो. पण नैराश्यग्रस्त व्यक्तींना याचेच दडपण येते. आपण इतरांसारखे थट्टा-विनोद करत गप्पा मारू शकत नाही, याचे वैषम्य वाटत असते, म्हणूनच ते इतरांना टाळतात. म्हणूनच त्यांना काही गोष्टी सुचवाव्यात, पण मागे लागू नये. त्यांना तुमचा आधार वाटायला हवा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या