Sunday, November 24, 2024
Homeब्लॉग‘काय आयडॉल...?’ कोणाला म्हणू

‘काय आयडॉल…?’ कोणाला म्हणू

नितीनने टोकाचे पाऊल उचलत अकाली निरोप घेण्याचा निर्णय का घेतला हे खरोखरीच समजण्याच्या पलीकडचे आहे. साधारणत: वैफल्यग्रस्त माणूस मेसेजमधून, बोलण्यामधून आपली मनोवस्था व्यक्त करतो. मात्र त्याच्या कोणत्याही वक्तव्यात कधीच काही जाणवले नाही. अगदी आता-आत्तापर्यंत तो नेहमीच्या उत्साहातच बोलत होता. समारंभांचे, सत्काराचे फोटो शेअर करत होता. पण आता हे सगळेच संपले…

जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसले तरी कोणाच्याही अकाली मृत्यूचे दु:ख खूप मोठे असते यात शंका नाही. विशेषत: ऊर्जेचा, अभिव्यक्तीचा, कल्पकतेचा, उच्च निर्मितीमूल्यांचा, सातत्यपूर्ण परिश्रमाचा आणि अचूकतेच्या अट्टहासाचा आग्रह धरणारी कोणी व्यक्ती अकाली, अवेळी आणि अनपेक्षितरित्या जग सोडून जाते तेव्हा आपण निरोपाचा हातही हलवू शकलो नाही, याचे दु:ख असतेच; खेरीज भविष्यकाळात त्याच्याकडून पुढे येऊ शकणार्‍या अद्भूत कलाकृतीही जन्माआधीच मृत पावल्याची भावना, एक अतृप्ती मनाचा कोपरा हळवा करुन जाते. नितीन देसाई या प्रख्यात कला दिग्दर्शकाच्या निधनाने मी नेमकी हीच भावना अनुभवतो आहे.

- Advertisement -

नितीनचे काम केवळ राज्य नव्हे तर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले. त्यांनी कलादिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची जंत्री वाचली तरी अफाट मोठेपण लक्षात येण्याजोगे आहे. ‘देवदास’च्या आधीपासून मी त्यांचे मोठे काम पाहिले होते, त्यांच्या कामाविषयी जाणून होतो. आमची ओळखही होती. पण ‘देवदास’मुळे ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाली आणि कालौघात ही मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली. तो सतत ‘देवदास’च्या सेटवर असायचा. तेव्हा मी मराठीतून हिंदी चित्रसृष्टीत आलेला नवोदित कलाकार होतो. मला छायाचित्रीकरणाची आवड असल्याचे तो जाणून होता. आमच्यातील मैत्री दृढ होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते. चित्रिकरणावेळी फोटोग्राफीशी संबंधित काही गोष्टींवर आमच्यामध्ये चर्चा व्हायची. तो माझा अभिप्राय विचारायचा.

त्या काळी चौधरी नामक लेखकाने ‘१०० आयडॉल्स’ नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात महाराष्ट्रातील आयडॉल्सबद्दलचा मजकूर असून माझ्याआधी नितीनबद्दल लेखकाने लिहिले होते. हा धागा धरुन मी त्याला ‘काय आयडॉल…?’ असे गमतीने म्हणायचो. त्यानंतर गप्पांचा अविरत झरा वहायला लागायचा. मला ‘देवदास’शिवायही त्याने केलेले सगळे चित्रपट खूप आवडतात. त्यातील बहुतेक चित्रपट त्याने त्याच्या स्टुडिओतच केले होते. अर्थातच केवळ चित्रपटच नव्हे तर ‘वीर शिवाजी’सारखी हिंदी मालिका तसेच अन्य कामही त्याने तिथूनच पूर्ण केले. ‘जिजाऊ’, ‘शेगावचे गजानन महाराज’ अशा साधारणत: वीस ते पंचवीस चित्रपटांचे कामही त्याने आपल्याच स्टुडिओमध्ये केले. आता सगळी नावे स्मरत नसली तरी त्याने केलेले प्रत्येक काम अफाट आणि अचाट होते, यात मात्र शंका नाही.

अर्जून रामपाल बरोबरचा ‘भीमा कोरेगाव’ आणि त्यानंतरचा ‘पानिपत’ हे त्याचे चित्रपट ही अगदी अलिकडची बाब आहे. ‘पानिपत’च्या वेळी अजय-अतुल नेहमी स्टुडिओतच यायचे. काम संपले की आमच्या मस्त गप्पा रंगायच्या. स्टुडिओमध्ये चित्रिकरण असायचे तेव्हा माझ्यासाठी प्रोडक्शनची एक खोली असायची. पण नितीन मला कधीच तिथे राहू द्यायचा नाही. मित्र वा आप्तेष्टांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये तो माझ्या राहण्याची सोय करायचा. मित्राने मित्राची ठेवावी अशी उत्तम बडदास्त ठेवायचा आणि भरपूर काळजी घ्यायचा. यातून त्याच्यातील माणूस-मैत्र जपण्याच्या वृत्तीचे दर्शन अगदी सहजगत्या दिसायचे.

नितीनची सौंदर्यदृष्टी नोंद घेण्याजोगी होती. प्रत्येक गोष्टीतले सौंदर्य कसे खुलून येईल, ते बटबटीत न वाटता चपखल, सहजसुंदर कसे वाटेल यावर तो खूप विचार करायचा. बारकाईने अभ्यास करायचा. कदाचित पटकन नजरेला येणार नाही, पण जवळून पाहिले तर त्याच्या प्रत्येक कामात हे वैशिष्ट जाणवते. उदाहरणार्थ, ‘जोधा अकबर’मध्ये अकबराच्या खर्‍या तलवारीवर लिहिलेल्या ओळीच त्याने चित्रपटातील या पात्राच्या तलवारीवरही कोरल्या होत्या. शॉटमध्ये त्या दिसणार नाहीत, वा क्लोज अपमध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे हे माहिती असूनही त्याने इतके डिटेलिंग केले होते. अर्थातच यापाठी त्याचे मोठे संशोधन असायचे. त्याचे व्हिज्युअलायझेन मोठे काम करुन जायचे. या सगळ्यामुळेच नितीनचे काम अविस्मरणीय ठरु शकले.

अनेक दिग्गजांना आपल्या कामाची प्रशंसा करण्याचा मोह आवरायचा नाही. संजय भन्साली, विनोद प्रधान यांना त्याच्या कामाचे विशेष कौतुक होते. केवळ कला दिग्दर्शनच नव्हे तर त्याला अभिनय वा अशा अन्य क्षेत्रातही रस होता. काही चित्रपटांमध्ये काम करुन त्याने अभिनयाची हौसही भागवून घेतली होती. कवितेविषयी त्याला विशेष ममत्त्व होते. म्हणूनच आमच्या गप्पांमध्ये कविता हादेखील अनेकदा डोकावणारा विषय असायचा. प्रत्यक्ष भेटलो नाही तरी आम्ही मेसेजद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचो. आयुष्यात घडणार्‍या छोट्या-मोठ्या बाबींविषयी तो या माध्यमातून बोलायचा, व्यक्त व्हायचा. घरातील लग्नकार्यासारख्या कार्यक्रमासाठी त्याचे आग्रहाचे आमंत्रण असायचे. हे सगळे पैलू मैत्र जपण्याच्या त्याचा स्वभाव दाखवून जात असत.

अशा मनमोकळ्या स्वभावावामुळेच त्याचे केवळ चित्रसृष्टीतच नव्हे तर विविध क्षेत्रातील लोकांबरोबर मित्रत्वाचे संबंध होते. त्याने अनेक राजकीय प्लॅटफॉर्म उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक मोठमोठ्या सभांवेळी उभी केली जाणारी भव्य व्यासपीठे त्याच्याकडून घडली आहेत. राजकीय क्षेत्रातील लोकांशीही त्याची चांगली मैत्री होती. हिंदी, मराठी चित्रसृष्टीत त्याच्या परिचितांचा मोठा वर्ग होता. मुख्य म्हणजे एकदा ओळख झाली, सूर जुळले की ते कायम ठेवण्याचा, स्नेह वृद्धिंगत करण्याचा त्याचा स्वभाव होता. त्यामुळेच त्याच्यातील कलाकाराला दाद मिळाली तशीच माणूस म्हणूनही त्याला दाद मिळत गेली. एक दिलदार, गप्पिष्ट माणूस म्हणून सगळे त्याला ओळखायचे. बर्‍याच विषयांवर बोलू शकत असल्यामुळे बराच वेळ गप्पा रंगायच्या. त्याची कंपनी अनुभवण्याजोगी असायची.

संशोधनाच्या कामासाठी आणलेली ऐतिहासिक विषयांवरील अनेक पुस्तके त्याच्या ऑफिसमध्ये असायची. त्याच्याकडे फोटोग्राफीविषयक पुस्तकांचा चांगला संग्रह होता. इतकेच नव्हे, क्लोदींग, कॉश्च्युम्स, हेअरड्रेसिंग आदी प्रांतांमधील ज्ञान असल्यामुळे त्याचे बोलणे नेमके आणि अर्थगर्भी व्हायचे. सर्व क्षेत्रात निपुण असल्यामुळे त्याचा प्रभाव प्रकर्षाने जाणवायचा. आपण विचारही करु शकणार नाही, अशा पातळीवर तो काम नेऊन ठेवायचा. अगदी ‘देवदास’मध्येदेखील त्याने उभे केलेले सेट्स आपल्या विचारांच्या पलीकडचे होते. त्यांची भव्यता डोळे दिपवणारी होती. त्यातील एक फ्रेम प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. एका गाण्यावेळी माधुरी नृत्य करत असून एका खिडकीत मी, एका खिडकीत जॅकी आणि एका खिडकीत शाहरुख बसल्याचे दाखवले आहे. नितीनने इथे कमाल केल्याची दिसते. त्याने माझ्या खिडकीच्या मागे दिसणारा रस्ता, त्यावर प्रवास करणार्‍या बायका, वर्दळ, रस्त्यावरील लाईट्स हे सगळे अतिशय बारकाईने दाखवले आहे.

इतकी परिपूर्णता असल्यामुळेच त्याला एक एक शॉट लावायला काही तासांचा अवधी लागायचा. रात्री जागून हे काम सुरू असायचे. पण यात त्याने कधीच कुचराई केली नाही. कोणत्याही गोष्टीत तडजोड करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. अशा या नितीनकडून आणखी खूप काम होऊ शकले असते. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल उचलत अकाली निरोप घेण्याचा निर्णय का घेतला हे मात्र खरोखरीच समजण्याच्या पलीकडचे आहे. साधारणत: वैफल्यग्रस्त माणूस मेसेजमधून, बोलण्यामधून आपली मनोवस्था व्यक्त करतो. मात्र त्याच्या कोणत्याही वक्तव्यात कधीच काही जाणवले नाही. अगदी आता-आत्तापर्यंत तो नेहमीच्या उत्साहातच बोलत होता. समारंभांचे, सत्काराचे फोटो शेअर करत होता. मात्र आता सगळेच संपले आहे. चित्रसृष्टीची फार मोठी हानी झाली आहे. ती भरुन येणे अवघड आहे…

(अद्वैत फीचर्स)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या