मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतमोजणीत तांत्रिक बिघाड झाल्यास निकाल थांबून राहू नये, यासाठी विशेष ‘पाडू’ (PADU – Printing Auxiliary Display Unit) यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
‘पाडू’ हे मतदान यंत्रातील (EVM) डेटा वाचणारे आणि तो थेट कागदावर प्रिंट करणारे एक महत्त्वाचे सहायक साधन आहे. मतदानाचे निकाल जाहीर करताना अनेकदा कंट्रोल युनिटच्या (Control Unit) डिस्प्लेमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. अशा वेळी निकालाचा आकडा पाहण्यात अडचण येते. यावर पर्याय म्हणून मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू यांनी ही ‘पाडू’ यंत्रणा विकसित केली आहे.
मतमोजणीच्या वेळी जर मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला, तर ही यंत्रणा कंट्रोल युनिटला जोडली जाईल. यानंतर, यंत्रातील रेकॉर्ड झालेली मते थेट कागदावर प्रिंट स्वरूपात मिळवता येतील. यामुळे तांत्रिक अडचणींमुळे मतमोजणी थांबणार नाही आणि उमेदवारांना तसेच निवडणूक प्रतिनिधींना त्वरित लेखी निकाल पाहता येईल. मुंबई महानगरपालिकेला अशा १४० यंत्रांचा पुरवठा करण्यात आला असून, यामुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल.
नियमांनुसार, मतमोजणी करताना प्रथम कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतांची पडताळणी केली जाते. मात्र, ही जोडणी करूनही जर निकाल डिस्प्लेवर दिसत नसेल, तरच ‘पाडू’ यंत्राचा वापर करण्याची परवानगी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष निर्देशानुसार पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर या यंत्रणेची तरतूद करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे मुंबईकरांच्या कौलाची मोजणी अधिक निर्विघ्नपणे पार पडेल, अशी खात्री प्रशासनाने व्यक्त केली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर अवघ्या २४ तासांत, म्हणजे १६ जानेवारीला या यंत्रणेच्या मदतीने प्रभागांचे भवितव्य स्पष्ट होईल.




