Monday, November 25, 2024
Homeब्लॉगमहासंशयकल्लोळ!

महासंशयकल्लोळ!

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येणार? याकडे महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांनी राज्यात महासंशयकल्लोळ नाट्य सुरू आहे. अजित पवार यांची नाराजी, ते भाजपत जाण्याच्या चर्चा, त्यावर भाजप नेत्यांची सूचक विधाने, त्यामुळे शिंदे गटात निर्माण झालेली अस्वस्थता, भाजप नेत्यांच्या दिल्लीवार्‍या, आघाडी नेत्यांमधील विसंवाद आदी घडामोडींनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे…

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली. महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. शिवसेनेला नमवण्यात आपण पूर्णपणे सरस ठरल्याचा आनंद दिल्लीतील भाजप नेत्यांना तेव्हा वाटला असेल. मात्र सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. तेव्हापासून सरकारच्या भवितव्याविषयीचा संभ्रम सत्ताबदल घडवणारे चाणक्य आणि सर्वसंबंधित नेत्यांच्या मनात कायम आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून दाखल याचिकांवर अनेक महिने युक्तिवाद सुरू होता. १६ आमदारांची अपात्रता हा सत्तासंघर्षाच्या खटल्यातील कळीचा मुद्दा आहे. प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र यासंबंधीचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. निकाल काहीही लागला तरी फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. ‘ईडी’ सरकारचे भवितव्य पणास लागले आहे. महाविकास आघाडीची पुढील रणनीतीदेखील येणार्‍या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल केव्हा आणि काय लागणार? याची उत्सुकता वाढली आहे.

- Advertisement -

निकाल सत्ताधारी शिंदे गटाविरोधात जाण्याची भाकिते बहुतेक जाणकार विधिज्ञांनी वर्तवली आहेत. त्यामुळे शिंदे गट व त्यांना पाठबळ देणार्‍या भाजपत बरीच अस्वस्थता पसरल्याची कुजबूज सुरू आहे. अशा संभ्रमित वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे झुंजार नेते अजित पवार यांच्याबाबतची बातमी एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली. अजित पवार ४० आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपसोबत जाणार, असा दावा त्या बातमीत करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारणारे १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरवले जातील, असे गृहीत धरून एकनाथ शिंदे यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागू शकते, राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांनी संमतीच्या स्वाक्षर्‍या दिल्या आहेत, असा दावाही त्या बातमीत करण्यात आला.

एवढेच नव्हे तर अजित पवारांसोबत कोणकोणते आमदार जाऊ शकतात त्यांची नावेही चर्चिली गेली. इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेऊन अनेक नव्या कपोलकल्पित बातम्यांना जन्म दिला गेला. अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांचे छोटे पडदे व्यापले गेले. त्याचे पडसाद भाजप आणि शिंदे गटात उमटले. त्यांच्या नेत्यांकडून पवारांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया तत्परतेने दिल्या गेल्या. शिंदे गटातील एका नेत्याने तर ‘अजित पवार भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू’ असा इशाराच देऊन टाकला. दुसर्‍या एका नेत्याने ‘अजित पवारांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस घेतील’ असे ठासून सांगितले.

भाजपच्या काही नेत्यांनी सावधपणे अजित पवारांच्या स्वागतापर्यंतच्या प्रतिक्रिया हिरीरीने दिल्या. तरीसुद्धा अजित पवार शांत राहिले. मात्र कोलाहल फारच वाढल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या चर्चा आणि अफवांचा फुगा फोडला. पत्रकार परिषदेत अजितदादा बरेच संतप्त आणि आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांनाही पवार यांनी नामोल्लेख टाळून सुनावले. नव्या राजकीय समीकरणांच्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही, आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहोत, असे त्यांनी ठासून सांगितले. हा विषय आता इथेच संपवा, असे सांगून माध्यम प्रतिनिधींचेही कान टोचले. भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

अजित पवार भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना पूरक ठरली ती त्यांनीच केलेली काही विधाने! शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरले तरी शिंदे-फडणवीस सरकार जाणार नाही, असा विश्वास अजितदादांनी नुकताच व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदी यांना डिग्री पाहून नव्हे तर त्यांचा करिष्मा पाहून जनता निवडून देते, असेही ते म्हणाले होते. मतदान यंत्रे हॅक होण्याबाबत शरद पवार यांनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली होती. याउलट अजित पवार यांनी मतदान यंत्रांवर विश्वास दाखवला होता. अजित पवारांबाबत वावड्या उठवल्या जात असताना भाजपचे काही नेते दिल्लीला जाऊन आले. त्यांच्या दिल्लीवारीचा संबंध थेट अजित पवारांशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपच्या नागपुरातील एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यास स्वागतच आहे’ अशी प्रतिक्रिया देऊन पवारांबाबतच्या चर्चांना बळ दिले होते. अखेर आपल्याभोवती निर्माण झालेले संशयाचे धुके दूर करण्यासाठी अजित पवार यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर तरी त्यांच्याविषयी निर्माण केले गेलेले संशयाचे धुके आता विरले आहे, असे म्हणता येईल का?

अजित पवारांबाबतच्या बातम्या चर्चेत असताना ‘येत्या पंधरवड्यात राज्यात दोन मोठे राजकीय स्फोट घडतील’ असे भाकित वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले. त्यापुढे जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येत्या काळात दोन राजकीय स्फोट घडतील, त्यातील एक दिल्लीत तर दुसरा राज्यात असेल, असे सांगितले. मोदी-अदानी संबंधांवरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आक्रमक झाले असताना अदानी यांनी पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन नुकतीच त्यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयात फायलींचा निपटारा करतानाचे एक छायाचित्र नुकतेच ट्विट केले. त्यांच्यासमोर फायलींचा मोठा गठ्ठा छायाचित्रात दिसत आहे. ‘मिशन नो पेंडन्सी, ऑफिस वर्क. क्लिअरिंग पेंडन्सीज… कार्यालयीन कामकाज…’ अशा ओळी त्या चित्राखाली दिल्या. येत्या काळात राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांच्या सचित्र ट्विटला सत्तासंघर्षावरील येऊ घातलेल्या निकालाच्या मुद्याला जोडून पाहिले जात आहे. त्यामुळे संशयकल्लोळात आणखी भर पडली आहे. तशातच ‘मी जपान दौर्‍यावरून वेळेआधी नव्हे तर वेळेत राज्यात परतलो आहे’ असे सूचक भाष्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यातूनसुद्धा नव्या चर्चांना आणि वावड्यांना चालना मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांची सूचक वक्तव्ये, भेटीगाठी आणि चर्चांमुळे महाराष्ट्रात महासंशयकल्लोळ सुरू आहे. तो कधी निवळणार याची जनतेला प्रतीक्षा आहे. सत्तासंघर्षाचा निकाल येईपर्यंत तरी राज्यातील राजकीय वातावरण शांत राहील, अशी जनतेची अपेक्षा असेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या